तब्बल साडे चौदा किलो सोन्याच्या तस्करी प्रकरणी कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपास यंत्रणांनी अटक केली होती. तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ही १२ कोटी ५६ लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच रान्या राव ही कर्नाटक पोलीस दलामधील डीजीपी रामचंद्र राव यांची कन्या असल्याने या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे. दरम्यान, कर्नाटकमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या रामचंद्र राव यांनी रान्या राव हिच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईबाबत धक्कादायक विधान केलं आहे.
रान्या राव हिचे वडील रामचंद्र राव यांनी सांगितले की, जेव्हा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला ही बातमी समजली तेव्हा मला धक्का बसला. मी निराश झालो. मला याबाबत काहीही माहिती नव्हतं. या प्रकारामुळे इतर कुठल्याही वडिलांप्रमाणेच मी देखील स्तब्ध झालो आहे. मात्र रान्या राव ही आमच्यासोबत राहत नाही. ती तिच्या पतीसोबत वेगळी राहते. त्यांच्यामध्येही काही कौटुंबिक समस्या असाव्यात. असो, कायदा आपलं काम करेल. पोलीस खात्यामधील माझी कारकीर्द निष्कलंक आहे. माझ्या कारकिर्दीवर आतापर्यंत कुठलाही डाग लागलेला नाही. यावेळी मी यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही, असे रामचंद्र राव म्हणाले.
दरम्यान, रान्या रावला महसूल गुप्तचर विभागाने अटक केल्यानंनंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी रान्याच्या लावेल रोड येथील घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान अभिनेत्रीच्या घरातून २ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं.
३१ वर्षीय रान्या ही कर्नाटकातील चिकमंगलूरची रहिवासी आहे. तिने बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पण तिला चित्रपटसृष्टीत रस होता. म्हणूनच तिने किशोर नमित कपूर एक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं. रान्या रावने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप यांनी केलं होतं, ज्यांनी स्वतः त्यात मुख्य भूमिका साकारली होती.