चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एका गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, असे सरदारशहरचे तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी सांगितले. तसेच, या गायींचा मृत्यू चाऱ्यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तपास अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे कुतेंद्र कवर म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सरदारशहरमधील बिल्युबास रामपुरा येथील श्री राम गोशाळेतील आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सायंकाळपासून या गोशाळामध्ये ८० गायींचा मृत्यू झाला, तर अन्य काही आजारी आहेत. पशुसंवर्धन व वैद्यकीय विभागाच्या पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
शुक्रवारी सायंकाळी गोशाळेतील गायी अचानक आजारी पडण्यास सुरुवात झाली. रात्री ८० गायींचा मृत्यू झाला. इतर काही गायी आजारी आहेत. यामधील बहुतेक गायींची प्रकृती ठीक आहे, असे विभागाचे सहसंचालक डॉ. जगदीश बरबड यांनी सांगितले. तसेच, कदाचित चाऱ्यासोबत काही विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे गायींचा मृत्यू झाल्याची शंका आहे. त्यामुळे चाऱ्याचे नमुने घेतले असून चाचणीसाठी पाठविले आहेत, असे डॉ. जगदीश बरबड यांनी सांगितले.
पंचकुलामध्ये ७० गायींचा मृत्यू झाला होतागेल्या महिन्यात पंचकुलाच्या माता मनसा देवी मंदिराजवळील गोशाळेत अन्न विषबाधेमुळे ७० गायींचा मृत्यू झाला होता. तर ३० गायींवर उपचार सुरू होता. सायंकाळी उशिरा बाहेरून आलेल्या एका व्यक्तीने या गायींना अन्न दिल्याचे सांगण्यात आले होते. हे अन्न खाल्ल्यानंतर गायींची प्रकृती खालावली, त्यानंतर सकाळपर्यंत ७० गायींचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली. तसेच, भविष्यात गोशाळेत चारा टाकण्यापूर्वी त्याची चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.