सुरत : प्रशिक्षाणार्थी महिला लिपिकांना वैद्यकीय तपासणीसाठी महानगरपालिकेच्या इस्पितळातील एका कक्षात एकत्र विवस्त्र उभे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरत महानगरपालिकेतील दहा प्रशिक्षणार्थी महिला लिपिकांना वैद्यकीय तपासणीसाठी महापालिकेच्या इस्पितळातील स्त्रीरोग कक्षात विवस्त्र अवस्थेत उभे करण्यात आल्याच्या आरोपाप्रकरणी सुरत महानगरपालिकेचे आयुक्त बंछानिधी पणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गुजरातमधील भूज शहरातील महिला महाविद्यालयाच्या वसतिगृहात काही दिवसांपूर्वी रज स्राव (विटाळ) होत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतर सुरतमधील हा धक्कादायक प्रकार समोर आला. सुरत महानगरपालिका कर्मचारी संघटनेने गुरुवारी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत असा आरोप केला की, अविवाहित महिलांचीही इस्पितळातील महिला डॉक्टरांनी गर्भावस्थेसंबंधी तपासणी केली.ही धक्कादायक घटना सुरत महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन इस्पितळात २० फेब्रुवारी रोजी घडली. तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त पणी यांनी चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली असून या समितीला १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. कल्पना देसाई, मनपाच्या सहायक आयुक्त गायित्री जरीवाला आणि कार्यकारी अभियंता तृप्ती कलाथिया यांचा समावेश आहे.