कोयंबत्तूर : तामिळनाडूतील कोयंबत्तूरमध्ये एका महिलेला धावत्या गाडीतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेला तिचा पती आणि सासू-सासऱ्याने धावत्या गाडीतून फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे.
आरती अरुण असे या धावत्या गाडीतून फेकून देण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आरती आणि तिचा पती अरुण अमलराज यांच्यात वाद सुरु होते. मात्र, नव्याने संसार करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी आरती आपल्या दोन मुलांना घेऊन पतीसोबत राहण्यासाठी कोयंबत्तूरला आली होती. आरतीचा पती अरुण इंजिनीअर असून त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पंरतू अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. अरुण आणि त्याचे आई-वडील गेल्या काही महिन्यांपासून फरार आहेत.
आरती आणि अरुण यांचे 2008 मध्ये लग्न झाले होते. मात्र, दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद होत होते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांनी वेगळे राहण्याच निर्णय घेतला आणि आरती मुलांना घेऊन आपल्या आई-वडिलांकडे मुंबईला गेली. दरम्यान, आरतीने मुंबईतील कोर्टात कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोट यासंबंधी याचिका दाखल केली होती. मात्र, अरुणने आरतीसोबत पुन्हा संसार सुरु करण्याल तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा आरती अरुणसोबत राहायला गेली. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा दोघांत वाद निर्माण होऊ लागले.
उटीमध्ये फिरायला गेले असाता अरुणने आरतीला शिवीगाळ केली. तसेच, तिच्यासोबत मुलांनाही मारहाण केली. याप्रकरणी आरतीने उटीमधील पोलीस ठाण्यात अरुणविरोधात तक्रार दाखल केली होती. परंतू अरुणने माफी मागितल्यानंतर पुन्हा आरती त्याच्यासोबत गेली. मात्र, गेल्या महिन्यात 9 तारखेला कोयंबत्तूरमध्ये आरतीला अडचणींचा सामना करावा लागला.
अरुणने आरतीला आपल्या आई-वडिलांपासून दूर ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर गाडीतून अरुण आपल्या आई-वडिलांना घेऊन आला. यावर आरतीने सवाल उपस्थित केल्यानंतर त्याने तिला मारहाण केली आणि धावत्या गाडीतून फेकून दिले. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अरुणने आरतीला तिच्या बहिणीच्या घरासमोर फेकून दिले. यावेळी तिच्या डोक्याला आणि हाताला मार लागला आहे.
आरती सध्या मुंबईत राहत असून ती म्हणाली, "अरुण आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या जीवाला धोका आहे. माझ्या मुलाने त्याला शाळेबाहेर पाहिले होते. त्याच्याकडून मुलांना त्रास होऊ शकतो." दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.