नवी दिल्ली, दि. 8 - गेल्या काही दिवसांत सीमेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे निदर्शनास येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता सीमेवरुन हे दहशतवादी देशातही घुसखोरी करुन लागलेत. राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्यामध्ये गेल्या आठवड्याभरात 11 दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कधी 'मानव बॉम्ब' बनून तर कधी लष्कर किंवा पोलिसांची वर्दी घालून घुसखोरी करण्याचा प्रयत्न या दहशतवाद्यांकडून करण्यात आला आहे. एका दहशतवाद्यानं तर भगवे कपडे परिधान करुन लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पोलीस, जवानांनी या सर्वांचे प्रयत्न हाणून पाडले आहेत.
ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या कारभार प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त करत असाल, तर जरा थांबा. कारण हे दहशतवादी खरे नाहीत, तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा यंत्रणाकडून सर्व बाजूनं तपासणी करण्यात सुरू असलेली एक मोहीम आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला परिसरातील सुरक्षेत त्रुटी तर राहिलेल्या नाहीत ना हे तपासण्यासाठी पोलीस आणि पॅरामिलिट्री फोर्स परिसरात 'डमी टेररिस्ट' पाठवत आहेत. याद्वारे लाल किल्ल्याची सुरक्षेत कोणतीही कमी राहू नये, यावर ते भर देत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त होणा-या भव्य-दिव्य अशा कार्यक्रमामुळे लाल किल्ला परिसर बंद करण्यात आला आहे.
येथे ठिक-ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. चहुबाजूंना प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हींची नजर आहे. या सर्व सुरक्षा यंत्रणांची सतर्कता पडताळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांशी संबंधीत असलेली लोकंच आपली ओळख लपवून डमी टेररिस्टच्या वेशात सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात स्पेशल सेल आणि स्पेशल ब्रांचच्या जवानांचाही समावेश होता. सुरक्षेसाठीत तैनात करण्यात आलेले जवान आणि अधिका-यांची खबदारी व सतर्कता तपासण्यासाठी हे डमी टेररिस्ट सुरक्षा चक्र तोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी एखादा डमी टेररिस्ट ज्याठिकाणी सुरक्षा चक्र तोडण्यात यशस्वी होऊन घुसखोरी करतो, तेथील तैनात जवानांवर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली कारवाई करण्यात येते.
गेल्या वर्षी सुरक्षेत निष्काळजीपणागेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे दिल्ली पोलीस, जवान आणि बड्या अधिका-यांना फटकारण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर यंदा डमी टेररिस्टच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.