जम्मू : पोलिसांच्या एका जवानाने धाडस दाखविल्याने शुक्रवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दहशतवाद्यांचे हे एन्काउन्टर जम्मूपासून 28 किमी अंतरावरील एका टोल प्लाझावर करण्यात आले. हे दहशतवादी एका ट्रकमध्ये लपलेले होते. त्यांच्याकडे 5 रायफल, आरडीएक्स आणि बुलेटप्रूफ जॅकेटही होती. ते राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. यानंतचर पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केली. धक्कादायक म्हणजे पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करणाऱ्याचा तो भाऊ आहे.
दहशतवादी आदिल डारने गेल्या वर्षी फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही आदळवली होती. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. याच आदिलचा भाऊ समीर डार याने गुरुवारी रात्री उशिरा 2 वाजता कठुआ जिल्ह्यातील हीरानगर सेक्टरमधून तीने ते चार दहशतवाद्यांना ट्रकमध्ये बसविले होते. हे दहशतवादी राष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करून जम्मूमध्ये घुसले होते. हे सर्व ट्रकमध्ये मागच्याबाजुला लपलेले होते आणि काश्मीरला जात होते.
शुक्रवारी पहाटे 5 वाजता हा ट्रक टोल प्लाझावरून जात होता. यावेळी नगरोटा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल भौमराज यांनी हा ट्रक थांबविला. यावेळी त्यांच्यासोबत दोन पोलिस आणि सीआरपीएफचे जवान होते. भौमराज यांनी सांगितले की, मी चालकाला मागची खिडकी उघडायला सांगितली. आतमध्ये पाहिले असता गोण्यांच्यामध्ये काही भाग खंदकासारखा दिसत होता. आजुबाजुला काही कांबळे पडले होते. काठीने कांबळे बाजुले केले असता तेथे बूट दिसले. यामुळे संशय आल्याने चालकाला खाली उतरण्यास सांगून मागील बाजू उघडण्यास सांगितले.
यावेळी चालक औषधे काश्मीरला नेत असल्याचे सांगत होता. ट्रकच्या मागील भागात मी काठी घेऊन चढलो. मला पाहताच तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. माझ्या हाताला गोळी लागली पण मी वाचलो. गोळ्यांचा आवाज ऐकून सीआरपीएफच्या जवानांनीही जागा घेत एन्काऊन्टर सुरू केले. यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले, असे भौमराजने जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांना सांगितले.