जम्मू : पोलिसांच्या एका जवानाने धाडस दाखविल्याने शुक्रवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमध्ये लपलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करणाऱ्या आदील दारचा भाऊच या दहशतवाद्याची वाहतूक करत होता. त्याच्या चौकशीमध्ये सुरक्षा यंत्रणांना हादरवणारी माहिती समोर आली आहे.
दहशतवादी आदिल दारने गेल्या वर्षी फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही आदळवली होती. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. याच आदिलचा भाऊ समीर दारला अटक करण्यात आली आहे. त्याने चौकशीत मोठा खुलासा केला आहे. जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडे सामान्य स्टीलपासून बनविलेले असे काडतूस आहेत की त्यामध्ये बुलेटप्रूफ गाड्या भेदण्याची प्रचंड क्षमता आहे. या काडतुसांच्या निर्मितीवर जागतीक बंदी असताना केवळ चीनच ही काडतुसे बनविते. तेथूनच दहशतवाद्यांना पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
समीर दारच्या या खुलाशानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बुलेटप्रूफ गाड्या आणि बंकरवरून संरक्षण दलाची चिंता वाढली आहे. दारने डिसेंबरमध्येही दहशतवाद्यांना काश्मीर घाटीमध्ये सोडले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्टीलने बनविलेली काडतुसे होती.
गेल्या वर्षी अंनतनाग जिल्ह्यामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या जवानांनी बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. तरीही दहशतवाद्यांच्या गोळ्या आरपार गेल्या होत्या. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. तपासामध्ये दहशतवाद्यांनी स्टीलच्या गोळ्यांचा वापर केल्याचे समोर आले होते.
स्टीलची बुलेट म्हणजे कशी असते? पाकिस्तानची आयएसआय स्टीलची काडतुसे जैश ए मोहम्मदला पुरवत आहे. चीनमधून आयएसआयला या गोळ्या मिळत आहेत. याच गोळ्यांचा वापर भारतीय जवानांविरोधात केला जाऊ लागला आहे. स्टील बुलेटचा वापर सोपा आहे. एके-47 मध्ये ही वापरता येतात. एकावेळी मॅगझीनमध्ये दोन ते तीन गोळ्या भरता येतात. जैशचा दहशतवादी नूर मोहम्मद तांत्रे उर्फ पीर बाबा हा दहशतवाद्यांना या गोळ्या देत आहे. ही बुलेट कठीण स्टील किंवा टंगस्टनपासून बनविली जाते. यामुळे ही सामान्य बुलेटपेक्षा जास्त संहारक असते. सामान्य बुलेटमध्ये साधे स्टील वापरले जाते. यामुळे ही बुलेट बुलेटप्रूफ आवरण भेदू शकत नाही.
व्हीआयपींनाही धोकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी एसपीजी ही देशातील सर्वात सुरक्षित एजन्सी कार्यरत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान हे बुलेटप्रूफ गाड्य़ा वापरतात. मात्र, स्टीलच्या बुलेट दहशतवाद्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. यामुळे सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या सुरक्षा रणनीतिवर पुन्हा विचार करण्य़ाची वेळ आली आहे.
पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 कोटी; वर्षभरात 180 कोटींची वाढ