रायपूर - छत्तीसगडमधील कोबरामध्ये दोन मद्यपी युवकांनी विषारी साप खाल्ल्याची अजब घटना समोर आली आहे. या तरुणांपैकी एकाने मद्याच्या नशेमध्ये विषारी बेलिया करैत सापाचे तोंड खाल्ले. तर दुसऱ्याने त्या सापाची शेपटी खाल्ली. दरम्यान, तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Two drunken youths ate a venomous snake in a bite)
मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ४ देवांगन पारा येथील इंदिरानगर मोहल्ल्यातील जैतखाम परिसरामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरा बेलिया करैत साप सापडला. या सापाला कुटुंबातील एकाने मारले. त्यानंतर त्याला अर्धवट जाळून फेकून दिले. त्यानंतर काही वेळाने तिथेच राहणारे दोन तरुण राजू जांगडे आणि गुड्डू आनंद मद्याच्या धुंदीत तिथे पोहोचले. त्यांनी मेलेला बेलिया करैत साप पाहिला आणि तो चकणा म्हणून खाल्ला.
राजूने या सापाचे तोंड आणि गु्डूने सापाच्या शेपटीचा भाग खाल्ला. त्यानंतर काही वेळाने दोघांची तब्येत बिघडली. तेव्हा कुटुंबीयांनी धावाधाव करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. या दोघांपैकी राजूची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, पोलिसांना सापाच्या जळालेल्या शरीराचे अवशेष गोळा करून तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसान दोन्ही तरुणांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि विषारी सापाला खाल्ले.
काही महिन्यांपूर्वी छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यामध्येसुद्धा करैत साप खाल्ल्याची घटना घडली होती. तिथे घराची साफसफाई करताना सापडलेल्या करैत सापाला अर्धमेला करून सोडले होते. तेव्हा या कुटुंबातील एका युवकाने नशेमध्ये सापाला उचलून तो त्याच्यासोबत खेळू लागला होता. दरम्यान, या सापाने त्याचा चावा घेतला. तेव्हा संतापून या युवकाने त्या सापाच्या डोक्याचा चावा घेत त्याला खाल्ले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.