चेन्नई: न्यायाधीश हा प्रथम वकील असावा लागतो, हा साधा सरळ नियम आहे. परंतु तमिळनाडूतील एक व्यक्ती कायद्याची मान्यताप्राप्त पदवी नसूनही तब्बल २५ वर्षे न्यायाधीश म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मदुराई जिल्ह्यातील उलगनेरी येथील पी. नटराजन या महाभागाने ही अजब ‘कर्तबगारी’ केली आहे. तमिळनाडूच्या न्यायिक सेवेत २५ वर्षे न्याय दंडाधिकारी या पदावर नोकरी करून नटराजन ३० जून २००३ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी तमिळनाड व पुद्दुचेरी बार कौन्सिलकडे नोंदणी करून वकिलीची सनद घेतली.मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने ‘बनावट’ वकिलांचा पायबंद करण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व वकिलांची पात्रता तपासून पाहण्याचा आदेश सर्व राज्यांच्या बार कौन्सिलना दिला. त्यानुसार शहानिशा करत असताना नटराजन यांचे हे धक्कादायक प्रकरण उघड झाले.नटराजन यांच्याकडे कर्नाटकमधील म्हैसूर विद्यापीठाशी संलग्न शारदा विधी महाविद्यालयातून सन १९७८ मध्ये दोन वर्षांच्या पत्राचार अभ्यासक्रमाने घेतलेली ‘बीजीएल’ ही कायद्याची पदवी आहे. अशा पत्राचाराने मिळविलेली पदवी फक्त अभ्यासापुरती मान्यताप्राप्त मानली जाते, नोकरीसाठी नाही. तरी अशा अमान्यताप्राप्त पदवीच्या जोरावर नटराजन यांची १९८३ मध्ये मुळात दंडाधिकारी म्हणून निवड कशी झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्थात नटराजन यांच्या या बनावटपणामध्ये बार कौन्सिलचाही सहभाग आहे. कारण दंडाधिकारी म्हणून नेमणूक होण्यासाठी ‘वकील’ म्हणून नोंदणी असणे गरजेचे असते. नटराजन यांच्याकडे तशी नोंदणी होती. त्यामुळे अमान्यताप्राप्त पदवीवर त्यांची मुळात बार कौन्सिलने ‘वकील’ म्हणून नोंदणी कशी केली व नंतर सरकारने त्यांची दंडाधिकारी म्हणून निवड करून तब्बल २५ वर्षे त्या पदावर नोकरी कशी करू दिली, असे प्रश्न या प्रकरणात उभे राहिले आहेत.बार कौन्सिलने आता नटराजन यांची ‘वकील’ म्हणून केलेली नोंदणी रद्द करण्यासाठी त्यांना नोटीस काढली आहे. जी व्यक्ती २५ वर्षे न्याय दंडाधिकारी पदावर नोकरी करून निवृत्त झाला त्याच्यावर अशी कारवाई करणे अन्यायाचे आहे, असे नटराजन यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
धक्कादायक प्रकार : वकील नसूनही ते होते २५ वर्षे न्यायाधीश! कायद्याची अमान्यताप्राप्त पदवी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 1:50 AM