एरव्ही कारचा सनरुफ उघडून उभे राहिलेल्यांवर पोलीस कारवाई करतात. कारण ते जीवघेणे असते. परंतू, राजकीय नेत्यांच्या रॅलीमध्ये गाड्यांच्या टपावर रेलिंग उभारून नेतेमंडळी उभी असतात. त्यांच्यावर कधीच कोणत्या राज्यात कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. परंतू, आता त्यावर विचार करण्याची वेळ आल्याचे तेलंगणामधील व्हिडीओ दर्शवत आहे.
तेलंगणाच्या आरमरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अपघात झाला आहे. सत्ताधारी पक्ष बीआरएसचे मंत्री केटीआर हे रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून खाली पडले आहेत. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रचारासाठी टेम्पो ट्रॅव्हलरच्या टपावर रेलिंग बांधण्यात आले होते. प्रचाराच्या रॅलीत अचानक चालकाने टेम्पो ट्रॅव्हलरचा वेग वाढविला आणि ब्रेक दाबला. यामध्ये रेलिंग तुटून मंत्री केटीआर, खासदार सुरेश रेड्डी आणि आमदार जीवन रेड्डी खाली कोसळले. या अपघातात मोठी दुखापत झालेली नसली तरी हे नेते किरकोळ जखमी झाले आहेत.
प्रचार रथाचे रेलिंग तुटल्याचे दिसताच खाली उभ्या असेलेल्या लोकांनी, सुरक्षा रक्षकांनी नेत्यांना पकडले. यामुळे जास्त दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतू, एकंदरीतच हा प्रकार सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
पहा व्हिडीओ...