नाचता नाचता अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गायक केकेचा मृत्यू देखील असाच झाला होता. यानंतर युपीमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एकाचा नाचत असताना मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांतच हनुमानाच्या भूमिकेत नाचणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आता जम्मूमधून अशीच एक घटना समोर आली आहे. पार्वती देवीच्या वेषात डान्स करणाऱ्या व्यक्तीचा नाचता नाचता हार्ट अॅटॅक येऊन मृत्यू झाला आहे.
जम्मूच्या बिश्नेहमध्ये जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. योगेश गुप्ता नावाचा व्यक्ती देवी पार्वतीच्या भूमिकेत नाचत होता. बराच वेळ नाचल्यानंतर तो अचानक जमिनीवर पडला पण परत उठलाच नाही. यामुळे आयोजकांची धावाधाव झाली. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोठे सैनिया गावात हा कार्यक्रम होता. यावेळी कलाकार देवी-देवतांच्या भूमिकेत नाचत होते. रंगमंचावर शिवपार्वतीच्या लीला रंगल्या होत्या. योगेश हा २० वर्षांचा होता. तो शिवस्तुतीवर नृत्य करत होता. नाचत असताना योगेश खाली पडला. तो उठत नसल्याचे पाहून शंकराच्या भूमिकेत असलेल्या कलाकाराने त्याच्याकडे धाव घेतली. काही काळ प्रेक्षकांना काहीच कळले नाही. नंतर त्यांना स्टेजवर काय घडले याचा अंदाज आला.
वाढदिवसाच्या पार्टीत मित्राचा मृत्यू...यापूर्वी बरेलीमध्ये डान्स करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (आयव्हीआरआय) नियुक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रभात प्रेमी (४५ वर्षे) हा त्याचा मित्र विशाल उर्फ मनीष याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला आला होता. शहरातील एका हॉटेलमध्ये या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर नाचत असताना त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांनी मैनपुरी येथील गणेश मंडळामध्ये नृत्य करताना कलाकार रवी शर्मा याचा मृत्यू झाला. हनुमानाचे पात्र साकारत असताना तो अचानक स्टेजवर पडला. उपस्थित प्रेक्षकांना तो अभिनय करतोय असे वाटले. पण काही वेळ तो उठला नाही की हालचाल नाही हे पाहून धावपळ उडाली. तोवर त्याचा मृत्यू झाला होता.