नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ही वेबसाइट हॅक करून त्यावर चिनी अक्षरं टाकली आहेत. ही वेबसाइट कोणी हॅक केली, याबाबत अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. आज संध्याकाळी साडेचार वाजता संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट https://mod.gov.in हॅक झाल्याची माहिती समोर आली. वेबसाइट ओपन केल्यानंतर होम पेजवर चिनी अक्षरं दिसत असल्याने चिनी हॅकर्सने ही वेबसाइट हॅक केल्याचा संशय आहे.
वेबसाइट उघडल्यानंतर ‘मिनिस्ट्री ऑप डिफेन्स’ (Ministry Of Defence) आणि हिंदीत ‘रक्षा मंत्रालय’ असे शब्द लिहिल्याचे पाहायला मिळत असून, त्यावर चिनी अक्षरं दिसत आहेत. वेबसाइट ओपन होण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. वेबसाइट हॅक केल्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वेबसाइट लवकरच पूर्ववत करण्यात येईल. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी महत्त्वाची पावलं उचलली जातील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.