लखनौ - लोकसभेत ट्रिपल तलाक विधेयक मंजुर झाल्याच्या आठवडा भरानंतरच एका मुस्लीम महिलेला तिच्या पत्नीने फोनवरुन तलाक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, केवळ घरी येण्यास 10 मिनिटांचा उशीर झाल्याचं कारण देत पतीकडून तलाक देण्यात आल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे. याबाबत पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशच्या इताह जिल्ह्यातील अलिगंज येथे ही घटना घडली आहे.
तलाक देण्यात आलेली पीडित महिला आपल्या पतीला सांगून घराबाहेर गेली होती. घराबाहेर जाताना केवळ 30 मिनिटांत परत येणार असल्याचं तिनं म्हटलं होतं. मात्र, येण्यास उशीर झाल्यामुळे पतीने तलाक (डायव्होर्स) दिल्याचं तिनं सांगितलं. पीडिता आपल्या आईच्या घरी गेली होती. आजी आजारी असल्यामुळे तिला पाहण्यासाठी, तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ती आईच्या घरी गेली होती. त्यावेळी, 30 मिनिटे होऊनही ती परतली नसल्याने तिच्या पतीने तिच्या भावाच्या मोबाईलवर फोन केला. तसेच, फोनवरुनच तलाक दिल्याचंही म्हटलं. पतीच्या या उत्तराने मी निशब्द झाल्याचं तिनं म्हटलंय.
पीडितीने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी पतीकडून मारहाण होत असल्याचेही तिने म्हटले. कारण, लग्नावेळी तिच्या कुटुंबीयांनी हुंडा दिला नव्हता. त्यामुळे पती नेहमीच यावरुन वाद घालत होता. तर, मला जबरदस्तीनं अबॉर्शनही करण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. दरम्यान, माझ्या आईचे कुटुंब गरीब असून पतीच्या मागण्या पूर्ण करणं त्यांच्यासाठी शक्य नाही. याप्रकरणी सरकारने लक्ष घालून मला मदत करावी, अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याचंही तिनं म्हटलं आहे. दरम्यान, अलिगंजचे एरिया ऑफिसर अजय भदौरिया यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याची खात्री दिलीय. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याचंही आश्वासन दिलंय. लोकसभेत 27 डिसेंबर रोजी ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाले होते.