कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका २८ वर्षीय विवाहितेला तिच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा वापर करून ब्लॅकमेल केल्याचे आणि तिला धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याच्या पत्नीसमोरच आपल्यावर बलात्कार केला. तसेच डोक्याला कुंकू न लावता बुरखा परिधान करण्यास भाग पाडले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
याबाबत केलेल्या आरोपांमध्ये पीडित महिलेने सांगितले की, आरोपी रफिक आणि त्याच्या पत्नीने माज्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर माझे काही आक्षेपार्ह फोटो काढले. त्या माध्यमातून मला ब्लॅकमेल करत इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला.
तर पोलिसांनी सांगितले की, रफिक आणि त्याच्या पत्नीने २०२३ मध्ये या महिलेला बेळगावमध्ये राहण्यास भाग पाडले. तसेच आपण जे सांगू ते विनातक्रार ऐकण्यास सांगितले. गतवर्षी हे तिघेही एकत्र राहायचे तेव्हा रफिकने त्याच्या पत्नीसमोरच आपल्यावर बलात्कार केल्याची माहितीही पीडित महिलेने दिली आहे. या प्रकरणी अधिक माहिती देताना बेळगावचे एसपी भीमाशंकर गुलेदा यांनी सांगितले की, या दाम्पत्याने कथितपणे या महिलेला कुंकू लावण्यास मनाई केली. तसेच तिला बुरखा परिधान करण्यासाठी आणि दिवसातून पाच वेळा नमाज पढण्यासाठी भाग पाडले. तसेच आपल्याला जातिवाचक शिविगाळ झाल्याचा दावाही या महिलेने केला आहे.
पीडित महिलेने याबाबत केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आरोपी रफिक याने मला माझ्या पतीला घटस्फोट देण्यास सांगितले. तसे न केल्यास माझे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. तसेच रफिक आणि त्याच्या पत्नीने धर्मपरिवर्तन न केल्यास जिवे मारण्याची धमकी मला दिली. आता या महिलेच्या तक्रारीवरून ७ जणांविरोधात सौंदत्तीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार संरक्षण कायदा, आयटी कायद्यातील संबंधित कलमं, एससी/एसटी कायदा या अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.