औरैया : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एकमेव हाती लागलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब हा भारतीय रहिवासी होता, असे प्रमाणपत्र उत्तर प्रदेश प्रशासनाने दिल्याने खळबळ माजली आहे. कसाबच्या जातीचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र जारी केले यानंतर त्वरित सावरत हे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
बिधुना तहसील कार्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. तेथील आंबेडकर गावातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने अजमल कसाबच्या जातीच्या आणि रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या प्रमाणपत्रामध्ये कसाबचे जन्मगाव आंबेडकर नगर असे नोंद आहे. तर हे प्रमाणपत्र 21 ऑक्टोबर, 2018 मध्ये जारी करण्यात आले होते.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना कसाबचा फोटोही लावण्यात आला होता. तरीही हे प्रमाणपत्र देताना अधिकारी आणि कर्मचारी त्याला ओळखू शकले नाहीत. तसेच प्रमाणपत्र देतानाही पडताळणी करण्यात आली नाही. अर्जामध्ये कसाबच्या वडिलांचे नाव मोहम्मद आमिर तर आईचे नाव मुमताज बेगम देण्यात आले होते.
कोण होता कसाब?अजमल कसाबने त्याच्या काही साथीदारांसोबत समुद्रमार्गे मुंबईत येऊन 26 नोव्हेंबरला 2008 मध्ये दहशतवादी हल्ला केला होता. शहीद तुकाराम ओंबळे यांनी त्याला गंभीर जखमी होऊनही जिवंत पकडले होते. या कसाबला 21 नोव्हेंबर 2012 मध्ये फाशी देण्यात आली होती. परदेशी नागरिकाला भारतात फाशी देण्याची ही पहिलीच घटना होती. या हल्ल्यात 166 जण ठार तर 600 पेक्षा जास्त जखमी झाले होते.