नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री भाषण करत असताना एका अज्ञात व्यक्तीनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेनं बूट भिरकावला आहे. त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताना कार्यकर्त्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणा सुरू केल्या. त्याचवेळी एक बूट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भिरकावण्यात आला आहे. सुदैवानं तो कोणालाही लागला नाही.मुख्यमंत्री लगेच भाषण आटोपून व्यासपीठावरून निघून गेले. हा आंदोलनकर्ता राजस्थानचा होता. राजकुमार सोनी असे या आंदोलनकर्त्याचे नाव आहे. त्यानं कोणत्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बूट भिरकावला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अण्णा आणि नरेंद्र मोदींचं भ्रष्टाचारमुक्तीचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य केल्या आहेत. कृषिमूल्य आयोगाला आणखी अधिकार देणार आहोत, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.अण्णा हजारेंना पुन्हा आंदोलन करावं लागणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. अण्णा हजारे यांनी अखेर सात दिवसांनी उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अखेर यश मिळालं असून, अण्णांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना लिंबू पाणी पाजलं आहे.