रुपनगर : पंजाबपोलिसांना एक व्यक्ती पोलिस उपअधिक्षक बनून तब्बल दोन वर्षे आदेश देत, सॅल्यूट घेत होता. मात्र, त्यांना या व्यक्तीबाबत जराही संशय आला नाही. दोन वर्षे त्याने अधिकार गाजवला. एवढेच नाही या अधिकारावर त्याने एका पोलिस उपनिरिक्षक महिलेसोबत लग्नही केले. मात्र, तिला संशय आल्याने या बनावट पोलिस उपअधिक्षकाचे बिंग फुटले आणि तो गजाआड गेला.
पंजाबच्या जालंधर भागात हा व्यक्ती कार्यरत राहिला होता. त्याने उपअधिक्षक म्हणून त्याचे नाव विक्रमजीत सिंह असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याचे खरे नाव मोहित अरोरा आहे. तो अमृतसरला राहतो. सध्या तो रुपनगर जेलमध्ये आहे. त्याच्याविरोधात रुपनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा नकली उप अधिक्षक खराखुरा बंदुकधारी पोलिस घेऊन विविध तपासणी नाके आणि पोलिस ठाण्यांमध्ये फिरत होता. या काळात त्याला एका तपासणी नाक्यावर तैनात असलेली महिला उप निरिक्षक आवडली. यावेळी तिला मागणी घालताना त्याने तिला आपण उप अधिक्षक असल्याचे सांगितले होते. ही उप निरिक्षक दंत चिकित्सकही आहे. त्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये लग्नही केले.
लग्नानंतर त्याच्या उप निरिक्षक पत्नीला संशय आला. मोहित अरोरा याने तिला सांगितले की त्याला निलंबित करण्यात आले आहे. यावर तिने पोलिस अधिकाऱ्यांना विनंती करून निलंबन रद्द करण्याचे सांगितले. यावर वेळोवेळी त्याने कारणे देत टाळले. त्याच्या निलंबनाची खबर पोलिस दलात पसरली आणि खरा प्रकार उघड झाला. चौकशीमध्ये तो नकली डीएसपी असल्याचे समोर आले. त्याला फसवणुकीच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्ण तपासानंतर अहवाल पोलिस महासंचालकांना पाठविण्यात येणार असल्याचे रुपनगरचे पोलिस अधिक्षक स्वपन शर्मा यांनी सांगितले.