जयपूर : शोलेमधील वीरूचा पाण्याच्या टाकीवरील सीन सर्वांना आवडतो. शोले स्टाईल आंदोलने केलीही जातात, पण एखादा बैलच पाण्याच्या टाकीवर चढला तर? कदाचित, ही कल्पना वाटेल, पण जयपूरमध्ये बैलाने तब्बल आठ तास प्रशासनाची आणि नागरिकांची झोप उडविली. त्यानंतर, त्याची सुटका करण्यात आली. रतनगढ तहसील परिसरातील नवगढिया भागात एक बैल पाण्याच्या साठ फूट उंच टाकीवर चढून बसल्याचे लोकांनी पोलिसांना फोन करून सांगितले. कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचे सुरुवातीला कंट्रोल रूममधील पोलिसाला वाटले, परंतु पोलिसांचे पथक तिथे दाखल झाले. बैलाला खाली आणायचे कसे? याचा विचार सुरू झाला. अखेर वेगवेगळे आवाज करून आणि रोप बांधून बैलाचे लक्ष वेधून घेण्यात आले. हा बैल खाली आला, तेव्हा उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरच याचे फोटो पोस्ट केले, तेव्हाही अनेकांना हे फोटो खरे असल्याची खात्री पटली नाही.
बैलाचीही ‘शोले’ स्टाईल
By admin | Published: July 14, 2016 3:17 AM