देशातील पहिले CDS बिपिन रावत ( Bipin Rawat) हे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. त्यांच्यासोबत पत्नी मधुलिका रावत ( Madhulika Rawat) यांचेही या अपघातात निधन झालं. या घटनेनं संपूर्ण देशभरात शोककळा पसरली. त्याचवेळी रावत यांची भाची व राष्ट्रीय नेमबाज बांधवी सिंह ( Bandhavi Singh) हीनं ११ सुवर्णपदकांची कमाई केली. तिनं ही सर्व सुवर्णपदकं काका बिपिन रावत आणि इतर शहिदांना समर्पित केली. बांधवी ही मधुलिका रावत यांचा लहान भाऊ यशवर्धन सिंह यांची मुलगी आहे.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना बांधवी सिंहनं सांगितलं की,''यंदाच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणं, हेच माझं एकमेव लक्ष्य होतं. मी इथे जिंकलेलं प्रत्येक सुवर्णपदक हे काका आणि त्यांच्यासह शहिद झालेल्या प्रत्येक योद्ध्याला समर्पित करू इच्छिते. मी नेहमी त्यांना मेंटॉर मानले आहे आणि मार्गदर्शक म्हणून ते माझ्या नेमही स्मरणात राहतील.'' मागच्या वेळेस झालेल्या स्पर्धेत बांधवीनं पाच सुवर्णपदकांसह ८ पदकं जिंकली होती, परंतु यंदा तिनं सुवर्णपदकांची संख्या दुप्पट केली.
बांधवी ही २२ व ५० मीटर कॅटेगरीतील राष्ट्रीय विजेती आहे. या स्पर्धेनंतर ती लगेचच दिल्लीसाठी रवाना झाली. शुक्रवारी बिपिन रावत यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. बांधवीनं सांगितलं की, बिपिन रावत फार कमी बोलायचे. पण, ते जे काही सांगायचे ते प्रेरणादायी असायचं. ते नेमही सांगायचं एखादं काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत आराम करू नये. त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांमुळेच निधानाचे वृत्त मिळूनही मी लक्ष्यापासून भरकटले नाही.
बांधवीची काकांसोबतची अखेरची भेट ऑक्टोबरमध्ये झाली होती. पेरू येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतून परतल्यानंतर ती दोन दिवस बिपिन रावत यांच्या नवी दिल्ली येथील घरी राहिली होती. ''तेव्हा त्यांनी मला काही कार्यक्रमात मला सोबत नेले होते. ती त्यांची आणि माझी अखेरची भेट असेल असे वाटले नव्हते,'असे बांधवी म्हणाली.