ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. २० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंद गळ्याच्या सूटची आज विक्री झाली असून हा सूट तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकण्यात आला.
धर्म नंदन समुहाचे मालक हितेन भाई पटेल यांनी हा सूट विकत घेतला आहे. हितेन भाई पटेल हे हि-यांचे व्यापारी आहेत. 'नरेंद्र दामोदरदास मोदी' असे रेषांमध्ये नाव गुफलेला सूट मोदींनी २६ जानेवारी रोजी बराक ओबामा भारत भेटीवर आले असता घातला होता. त्यांच्या या महागड्या सूट वरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यावर मौन बाळगत पंतप्रधानांनी या सूटचा लिलाव करून येणारी रक्कम गंगा स्वच्छता अभियानाकरता दान देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गेले तीन दिवस लिलाव प्रक्रिया सुरू झाली असता दहा लाखांच्या सूटची किंमत बोलीमध्ये वाढतच होती. याकरता लवजी बादशहा आणि जयंती अकलारा यांनी हे देखील पटेल यांचे प्रतिस्पर्धी होते. परंतू, शेवटच्या काही क्षणांमध्ये ४ कोटी ३१ लाख रुपयांना पटेल यांनी हा सूट विकत घेतला. पंतप्रधान मोदींबद्दल आदर असून त्यांनी हा सुट स्वतः मला भेट म्हणून द्यावा अशी इच्छा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली. हा सूट कार्यालयात आठवण म्हणून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले असून खरेदीची रक्कम ही राष्ट्र कार्यासाठी वापरण्यात येणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.