तामिळनाडूतूनबँकेच्या हलगर्जीपणाची दुसरी घटना समोर आली आहे. चेन्नईतील एका मेडिकल शॉपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात अचानक 753 कोटी रुपये ट्रांसफर झाले. फोनवर आलेला एसएमएस पाहून तो व्यक्ती आश्चर्यचकीत झाला. यानंतर तो बँकेत गेला असता, त्याला मोठा धक्काच बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, करणकोविल येथील रहिवासी असलेला मुहम्मद इद्रिस, तेनामापेठ येथील एका मेडिकल दुकानात काम करतो. 7 ऑक्टोबर रोजी त्याच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीला 2000 रुपये पाठवले होते. यानंतर इद्रिसने बॅंक बॅलन्स तपासण्यासाठी एसएमएस ओपन केला, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्याच्या खात्यात 753 कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता.
यानंतर इद्रिसने कोटक महिंद्रा बँकेची शाखा गाठली. तिथे गेल्यावर त्याला समजले की, तांत्रिक बिघाडामुळे एवडी मोठी रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली आहे. तसेच, बँकेकडून त्याचे अकाउंट सीज करण्यात आले. दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, एसएमएस मेसेजिंगमधील त्रुटीमुळे ही घटना घडली. खात्यात पैसे गेल्याचा मेसेज दिसत आहे, प्रत्यक्षात खात्यात पैसे ट्रांसफर झालेच नाही.
यापूर्वीही अशी घटना घडलीतामिळनाडूमधील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. अलीकडेच चेन्नई येथील कॅब ड्रायव्हर राजकुमार, यांच्या तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या (टीएमबी) खात्यात 9000 कोटी रुपये जमा झाले होते. हे प्रकरण समजताच टीएमबी बँकेने तत्काळ कारवाई केली आणि पैसे परत घेतले. तोपर्यंत राजकुमार यांनी मित्राच्या खात्यावर 21 हजार रुपये पाठवले होते. विशेष म्हणजे, या घटनेनंतर बँकेच्या सीईओंनी राजीनामा दिला.