श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय लष्करानं मोठी कारवाई करत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. शुक्रवारी (3 ऑगस्ट) संध्याकाळी भारतीय लष्कराला किलोरा गावात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान उडालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला. यानंतर शनिवारी (4 ऑगस्ट) सकाळीदेखील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम उडाली. ज्यामध्ये जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. या कामगिरीवर डीजीपी एस.पी. वैद्य यांनी जवानांची पाठ थोपटली आहे. ट्विटरच्या माध्यमातून डीजपी वैद्य यांनी जवानांना शाबासकी दिली आहे.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर ठारशुक्रवारी चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर उमर मलिकचा खात्मा करण्यात आला. उमर मलिक असं ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरुन उमर मलिकचं शव ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याजवळील AK-47देखील जप्त करण्यात आली आहे. शोधमोहीमेदरम्यान जवानांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळेस दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, गावामध्ये आणखी दहशतवादी लपून बसल्याचा संशय भारतीय लष्काराला असल्यानं परिसरात शोधमोहीम राबवण्यात आले आहे. तणावाची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून येथील इंटरनेट सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे.