श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर 5-6 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरलं आहे. यामध्ये दहशतवादी जीनत नाइकूचा समावेश आहे. जीनतला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्याची माहिती समजताच त्याचे वडील मोहम्मद इशाक नाइकू यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. जीनत शोपियामधील मेमंदर गावचा रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वी तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. त्याला आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी शोपियामध्ये घेरलं. याची माहिती समजताच त्याच्या वडिलांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. काल रात्रीपासून शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या भागातील एका घरात 5-6 दहशतवादी लपून बसले होते. यातील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. जवानांनी शेजारच्या घरांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. स्थानिकांकडून केली जाणारी दगडफेकदेखील नियंत्रणात आणली आहे. सध्या या ठिकाणी 34 राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि पोलीस तैनात आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी पोलिसांसह या संपूर्ण भागाला वेढा घातला आहे.
दहशतवादी मुलाला जवानांनी घेरलं; बातमी ऐकताच वडिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 11:55 AM