बंगळुरू - थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात. बंगळुरूच्या ग्राहक मंचाकडे असंच एक प्रकरण आलं आहे. राघवेंद्र केपी नावाच्या एका व्यक्तीला एका लिटरच्या एका पाण्याच्या बॉटलसाठी 21 रूपये जास्त द्यावे लागले होते. या फसवणुकीविरोधात राघवेंद्र यांनी किनले मिनरल वॉटर निर्माती कंपनी कोका-कोला, विक्रेता आणि रॉयल मीनाक्षी मॉल आदींविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राघवेंद्र यांना 5 डिसेंबर 2015 रोजी दुकानदाराने 1 लिटर पाण्याची बॉटल 40 रूपयांना दिली होती. पण त्या बॉटलवर 19 रूपये इतकी किंमत होती. त्यानंतर जयानगर येथील एका दुकानातून त्यांनी तीच पाण्याची बॉटल 19 रूपयांना विकत घेतली. या दोन्ही ठिकाणची चलन पावती राघवेंद्र यांनी ग्राहक न्यायालयात जमा केली आणि रॉयल मीनाक्षी मॉलमध्ये विकत घेतलेल्या बॉटलमुळे 21 रूपयांचं नुकसान झालं, त्यांनी फसवणूक केली अशी तक्रार केली. किनले मिनरल वॉटर निर्माती कंपनी कोका-कोलानेही दुकानदाराने फसवणूक केल्याचं मान्य केलं. 2016 च्या सुरूवातीपासून या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती. न्यायालयात सुनावणीच्या वेळी दुकानदाराने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगत तक्रारकर्ता राघवेंद्र खोटं बोलत असल्याचं म्हटलं. पण न्यायालयाने राघवेंद्र यांचा आरोप खरा अशून त्यांच्याकडून 21 रूपये जास्त आकारण्यात आल्याचं म्हटलं. परिणामी कोर्टाने दुकानदाराला12 हजार रूपये दंड ठोठावला आणि तक्रारकर्त्या राघवेंद्र यांना ते पैसे देण्यास सांगितलं. बंगळुरूच्या घ्राहक न्यायालयात आलेला हा निर्णय ग्राहकांच्या होणा-या फसवणुकीला आळा बसवण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे.
ग्राहकांचा आवाज-पाण्याची बाटली, शीतपेय असे पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किमतीला विकण्याचा प्रघात गेली अनेक वर्षे राजरोसपणे सुरू आहे. देशभरातील काही सजग ग्राहकांनी वेळोवेळी, ठिकठिकाणी तक्रारी केल्या आहेत. काही केसेसमध्ये अशा तक्रारी जिल्हा आणि राज्य पातळीवरील ग्राहक मंचानी फेटाळल्या आहेत. पण अखेर काही ग्राहकांनी जिद्दीनं राष्ट्रीय ग्राहक मंचापर्यंत जाऊन दाद मागितली आहे. आणि त्यातून काही केसेसमध्ये ग्राहकांच्या बाजूनं निकाल लागला आहे.उदाहरणार्थ, दिल्लीचे सचिन धिमन आणि शरण्य यांची ही केस. या दोघांनी भारतीय रेल्वेनं प्रवास करताना आयआरसीटीसी अर्थात रेल्वेला खानपान सेवा पुरवणा-या कंपनीकडून घेतलेली शीतपेयाची बाटली त्यांना 15 रु पयांना पडली, ज्याची एमआरपी फक्त १२ रुपये होती. तीन रुपयांसाठी कशाला लढायचं, असा विचार न करता हे दोघे लढले. दिल्लीच्या जिल्हा तक्रार निवारण मंचानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला. सचिन धिमन आणि शरण्य यांना न्याय मिळाला. दिल्लीच्या जिल्हा तक्रार निवारण मंचानं दिलेल्या निकालात म्हटलं की, ‘सचिन धिमन आणि शरण्य यांना आयआरसीटीसीनं अन्यायाची नुकसानभरपाई आणि केस लढवण्याचा खर्च आणि त्रास यांचा मोबदला म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावे तसेच आयआरसीटीसीने दंड म्हणून देशाच्या ग्राहक कल्याण निधीसाठी दहा लाख रुपये द्यावे. तक्र ार करायला हे दोघेच पुढे सरसावले; पण आयआरसीटीसीनं अनेक ग्राहकांना या प्रकारे लुबाडले असणार, म्हणून इतका दंड !’ अशा आणखीही काही केसेसमध्ये ग्राहकांना लुबाडण्याच्या विरोधात ग्राहकांच्या बाजूनं निकाल लागले आहेत.
कशी करायची तक्रार -
महाराष्ट्रभर कुठेही ओव्हरचार्जिंग होत असल्याचं आढळल्यास ०२२-२२८८६६६६ या क्र मांकावर तक्रार नोंदवता येईल. किंवा dclmms_complaints@yahoo.com, dyclmkonkan@yahoo.in इथं इमेलही करता येईल.