नवी दिल्ली : एक लिटर पाण्याच्या बाटलीचा दर हा रेल्वे स्थानक, बस स्थानक, हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणी वेगवेगळा असतो असा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल, पण आता पाण्याच्या बाटलीसाठी एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणा-या दुकानदारांचं काही खैर नाही. कारण आता एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणा-या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल तसंच त्यांना तुरूंगाची हवाही खावी लागेल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. फेडरेशन ऑफ होटेल अॅंड रेस्टॉरंट असोसिएशन्स ऑफ इंडियाने एक याचिका दाखल केली होती, त्याला उत्तर देताना ग्राहक व्यवहार मंत्रालयाने प्री-पॅक्ड किंवा प्री-पॅकेज्ड वस्तूंवर छापील किंमतीपेक्षा जास्त दर आकारणे लीगल मेट्रोलॉजी एक्ट अंतर्गत गुन्हा मानला जातो असं म्हटलं आहे. छापील किंमतीपेक्षा जास्त दर आकारणे हे ग्राहकांच्या अधिकारांचं उल्लंघन आहे, असा प्रकार म्हणजे टॅक्स चोरीला चालना देण्याचा प्रकार आहे. एमआरपीपेक्षा जास्त दर आकारल्याने सरकारला सर्विस टॅक्स आणि एक्साइज ड्यूटीमध्येही नुकसान होतं.काय आहे नियम- लीगल मेट्रोलॉजी एक्टच्या कलम-36 नुसार जर कोणी व्.क्ती छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत एखादी वस्तू विकताना आढळल्यास त्याला पहिल्यांदा असा गुन्हा केल्यामुळे 25 हजाराचा दंड आकारला जाईळ, पुन्हा त्याने ही चूक केल्यास 50 हजाराचा दंड आणि पुनरावृत्ती करत राहिल्यास 1 लाखाचा दंड किंवा एक वर्षाचा तुरूंगवास अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
पाण्याच्या बाटलीसाठी MRP पेक्षा जास्त दर आकारल्यास दुकानदार थेट तुरूंगात!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 3:06 PM