सुरेश भुसारीनवी दिल्ली : पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी कमी हाेण्याची शक्यता आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले जाईल. नंतर काही दिवसांतच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन साधारणतः दाेन टप्प्यांत हाेते. पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींचे अभिभाषण व त्यावर चर्चा तसेच आर्थिक सर्वेक्षण व नव्या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाताे. त्यावर चर्चा करून अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी दिली जाते. यानंतर संसदेला सुटी दिली जाते व पुन्हा काही दिवसांनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू हाेताे.
दुसरा टप्पा महत्त्वपूर्ण
यावेळी दिल्लीत काेराेनाचा वाढता संसर्ग व पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घाेषित झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी हाेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १० फेब्रुवारी रोजी हाेणार आहे.
यात सर्व मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील आहेत. दुसरा टप्प्यातील मतदान १४ फेब्रुवारी रोजी आहे. या टप्प्यात पंजाब, उत्तराखंड व गाेवा राज्यांतील संपूर्ण मतदान व उत्तर प्रदेशाचा दुसरा टप्पा संपणार असल्याने सर्व राजकीय पक्षांसाठी हा कालावधी प्रचारासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. याच काळात प्रचाराचा सर्वाधिक धुरळा उडणार आहे.
राजकीय पक्षांच्या एकमताची शक्यता
अर्थसंकल्प अधिवेशनाचा पहिला टप्पा लवकर संपवून दुसरा टप्पा मार्च महिन्यात मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर सुरू करण्यावर राजकीय पक्षांचे एकमत हाेण्याची शक्यता आहे. संसद सचिवालयातील अधिकाऱ्यांनी अधिवेशनाचा पहिला टप्पा लवकरच संपणार असल्याची शक्यता नाकारली नाही.