७० वर्षांतील उणिवा ६ वर्षांत झाल्या दूर; भाजप अध्यक्षांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:36 AM2020-05-31T06:36:00+5:302020-05-31T06:37:20+5:30
जे. पी. नड्डा : काँग्रेसने केले अडथळे आणण्याचे काम
नितीन अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मागील ७० वर्षांतील उणिवा मोदी सरकारच्या ६ वर्षांतील कार्यकाळात दूर झाल्या आहेत, असा दावा भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आभासी पत्रकार परिषदेत नड्डा यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेसने केवळ अडथळे आणण्याचे काम केले, असा आरोपही नड्डा यांनी केला.
नड्डा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागासह योग्य वेळी योग्य निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळेच भारतातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. बड्या राष्ट्रांच्या आरोग्य सेवा कोलमडल्या असताना भारतात लॉकडाऊनच्या काळात दररोजची कोरोना टेस्ट क्षमता १० हजारांवरून १.६० लाखांवर गेली आहे. आज देशात दररोज ४.५० लाख पीपीई कीट्स बनविल्या जात आहेत. ५८,००० व्हेंटिलेटर्स बनत आहेत. ५०,००० व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून खरेदी केले जात आहेत. आपण आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने चाललो आहोत. नड्डा यांनी सांगितले की, मोदी सरकारने दुसºया कार्यकाळातील पहिल्या वर्षात ३७० अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील धार्मिक आधारावर पीडित होऊन आलेल्या लोकांना मुख्य धारेत सहभागी होण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांच्या इच्छाशक्तीचा हा परिणाम आहे. त्याचे सूत्रधार गृहमंत्री अमित शहा हे बनले.
नड्डा यांनी म्हटले की, मोदी सरकारने तीन तलाक रद्द करून मुस्लिम महिलांची वेदना दूर केली. दहशतवादाशी लढण्यासाठी यूएपीए बनविला.
नड्डा यांनी सांगितले की, अयोध्येतील राममंदिराचे भाजपचे स्वप्न पूर्ण झाले. राममंदिराला काँग्रेसमुळे उशीर झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊ नये, यासाठी काँग्रेसने सतत अडथळे आणले.
नड्डा यांनी सांगितले की, छोट्या कार्यकाळात जे मोठे निर्णय मोदी सरकारने घेतले, ते भाजप सर्व जनतेपर्यंत पोहोचवील. यासंबंधातील मोदी यांच्या पत्रास १० कोटी लोकांपर्यंत पोहोचविले जाईल. २५० आभासी पत्रकार परिषदा, २ हजारांपेक्षा अधिक आभासी रॅली आणि भाजपच्या प्रत्येक आघाडीच्या ५०० रॅली आयोजित करण्यात येतील.
कोरोनाचे राजकारण नको
नड्डा यांनी सांगितले की, भाजपने कोरोना संकटावर राजकारण केले नाही. काँग्रेसचे वर्तन मात्र जबाबदारीचे नाही. भाजपचा सेवेवर विश्वास आहे.
च्श्रमिकांना त्रास सहन करावा लागला, हे खरे आहे. तथापि, भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस मात्र निरर्थक मुद्दे उपस्थित करून देशाची दिशाभूल करीत आहे.