श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधल्या शोपिआनमध्ये लष्करी जवानांच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या प्रकरणानं आता नवे वळण घेतलं आहे. या प्रकरणात एकीकडे 10 रायफल्सच्या जवानांना जम्मू-काश्मीरमधील पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोपी बनवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे लष्करानंही दगडफेक करणा-या तरुणांविरोधात काऊंटर एफआयआर नोंदवलं आहे.लष्कराकडून शोपिआन जिल्ह्यातील गोळीबाराच्या वेळी दगडफेक करणा-या लोकांविरोधात काऊंटर एफआयआर दाखल करण्यात आलंय. शनिवारी पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केलं होतं. ज्यात लष्कराच्या टीमचं नेतृत्व करणारे 10 रायफल्सच्या सैनिकांना आरोपी बनवण्यात आलं होतं. पोलिसांनी जवानांविरोधात हत्या(302) आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी(307) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लष्करही जवानांच्या बाजूनं उभं राहिलं आहे. आमची या प्रकरणातील भूमिका एकदम स्पष्ट आहे. कोणीही आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असंही मेजर गोगोई म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी ईदच्या दिवशीच सुरक्षा जवानांवर स्थानिक तरुणांनी दगडफेक केली होती. श्रीनगरमधील ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात तरुण जमा झाले होते. त्यानंतर त्यांनी सुरक्षा जवानांसह पोलिसांवर दगडफेक केली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी नळकांड्याही फोडल्या होत्या. काश्मीरमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यास परवानगी दिली नव्हती. ईदच्या निमित्तानं जम्मू-काश्मीरमधल्या अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र ईदगाह मैदानावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याच्या भीतीपायी पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती. पोलिसांचा जमावबंदी आदेश झुगारून ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. त्यानंतर जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्याच वेळी अनंतनागमध्येही दगडफेक करणारे तरुण आणि सुरक्षा दलाचे जवानांमध्ये वाद झाला होता. दिवसेंदिवस काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती वाढत आहेत. काश्मीरमध्ये अशांतता कायम राहावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असतो. पाकिस्तानला यात फुटीरतावादी नेत्यांची मदत मिळते. फुटीरतावादी नेतेच तरुणांना लष्करावर दगडफेक करण्यासाठी उद्युक्त करत असतात. तर दुसरीकडे नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडल्या आहे. त्यात दोन्हीकडच्या सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने 2017 मध्ये तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सरकारशी संबंधित असलेल्या गुप्तहेर खात्यामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.