Kolkata Hospital Crime : कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी नुकतीच पार पडली. देशभरात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळलेली असताना न्यायालयही याबाबत कठोर भूमिका घेताना दिसत आहे. हत्या आणि बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याची अनुपस्थिती आणि तपास यंत्रणेच्या वकिलांच्या येण्यास ४० मिनिटांचा उशीर झाल्याने न्यायालया संतप्त झालं होतं. आम्ही मुख्य आरोपीला जामीन द्यायचा का? असा सवाल करत न्यायालयाने सीबीआयच्या वकिलांना धारेवर धरलं.
कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश पामेला गुप्ता संतप्त झाल्या आणि त्यांनी सीबीआयला चांगलेच खडसावले. या प्रकरणातील मुख्य संशयित संजय रॉयच्या जामीन अर्जावर सियालदह न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र सीबीआयचे तपास अधिकारी आणि सरकारी वकील उशिरा पोहोचले. सीबीआयचे तपास अधिकारी आणि वकिलाच्या उशीरा येण्याचा न्यायाधीश पामेला गुप्ता यांना प्रचंड राग आला. त्यामुळे त्यांनी मी संजय रॉय यांना जामीन द्यायचा का? असा संतप्त सवाल केला.
सियादाह न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पामेला गुप्ता यांना सीबीआय अधिकाऱ्याने दुपारी ४:१० वाजता सरकारी वकील उशिरा पोहोचल्याची माहिती दिली. त्यावर पामेला गुप्ता यांनी रोष व्यक्त केला. 'वकील हजर नसतील तर त्याला (संजय रॉय) जामीन मिळायला हवा' असं न्यायमूर्ती पामेला गुप्ता म्हणाल्या. काही वेळ थांबूनही वकील दीपक पोरिया न आल्याने दंडाधिकाऱ्यांनी सीबीआय अधिकाऱ्याला त्यांना फोन करण्यास सांगितले. आता ४:२० झाले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही पामेला गुप्ता म्हणाल्या.
यानंतर सीबीआयचे तपास अधिकारी कोर्ट रूममधून निघून गेले आणि १५ मिनिटांनी परत आले. त्यांनी दीपक पोरिया येत असल्याचे सांगितले. संध्याकाळी ५ वाजता पोरिया आल्यावर बचाव पक्षाच्या वकील कविता सरकार यांनी २३ ऑगस्टला मागील सुनावणीला उपस्थित असलेले वकील यावेळी सीबीआयचे प्रतिनिधित्व का करत नाहीत, असा सवाल केला. त्यावर दीपक पोरिया यांनी ते तपास संस्थेचे पूर्णवेळ वकील आहेत आणि त्यांनी कोणतेही विशेष कारण न देता संजय रॉय यांच्या जामिनाला विरोध केला आहे, असे म्हटलं.
पोरिया यांनी रॉय यांच्या जामिनाला विरोध केला आणि म्हटलं की त्याची सुटका केल्याने तपासात अडथळा येऊ शकतो. त्यावर न्यायालयाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआयने तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले. न्यायालयाने पुन्हा संजय रॉय यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.