मथुरेमधील शाहा ईदगाह मशिदीला हटवून ती जागा हिंदूंकडे सोपवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. यादरम्यान, सुप्रीम कोर्टाने सांगितले की, या प्रकरणातील खटले हे अनेक कनिष्ठ न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी करणे तेवढंस आवश्यक नाही. ज्याठिकाणी ईदगाह मशीद आहे. त्याच ठिकाणी श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे. कोर्टाने त्या जागेवरील हिंदूंच्या पूजेचा अधिकार सुनिश्चित करावा, अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली होती.
याआधी अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणातील अनेक याचिका आधीपासून प्रलंबित असल्याचे सांगत ही मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी वादग्रस्त ठिकाण हे श्रीकृष्णाचं जन्मस्थान असल्याची मान्यता देण्याची मागणी केली होती. तसेच कृष्ण जन्मभूमीसाठी एका ट्रस्टची स्थापना करून संबंधित जमीन हिंदूंना सुपूर्द करावी, अशी मागणी केली होती.
हे स्थळ इस्लामच्या उदयापूर्वीपासूनचं आहे., असा दावा याचिकेतून करण्यात आला होता. तसेच भूतकाळामध्ये वादग्रस्त भूमीच्या संदर्भात करण्यात आलेल्या करारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. दरम्यान, सुनावणीवेळी न्यायमूर्ती खन्ना यांनी सांगितले की, जनहित याचिकेची आवश्यकता नाही आहे. कारण एकाच मुद्द्यावरून अनेक नागरी खटले आधीपासून प्रलंबित आहेत. आता तुम्ही ते जनहित याचिका म्हणून दाखल केले आहेत. तरी हा सामान्य खटला म्हणून दाखल करा, मग आम्ही पाहू, असे न्यायमूर्तींनी सांगितले.