जिंदमधील भाजपाच्या हरण्याची परंपरा तोडणार का खट्टर सरकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 02:43 AM2019-01-28T02:43:02+5:302019-01-28T02:43:23+5:30
हरियाणाच्या जिंदमध्ये एकच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मात देतील काय?
चंदीगड : हरियाणाच्या जिंदमध्ये एकच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मात देतील काय? खट्टर यांनी जिंद पोटनिवडणुकीत आपल्या पसंतीचे उमेदवार डॉ. कृष्ण मिडढा यांना भाजपाचे तिकीट दिले आहे.
मिडढा यांचे वडील डॉ. हरिचंद मिडढा इंडियन नॅशनल लोकदलाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. २८ जानेवारी रोजी १ लाख ७० हजार मतदार आपल्या मतांचा हक्क बजावतील. जिंद येथून दोनदा आमदार राहिलेले डॉ. हरिचंद मिडढा यांचे पुत्र डॉ. कृष्ण मिडढा यांना खट्टर यांनी इंडियन नॅशनल लोकदलापासून वेगळे करीत भाजपामध्ये सहभागी करून घेतले. तसेच, त्यांना पोटनिवडणुकीची उमेदवारीही दिली. खट्टर यांना विश्वास आहे की, ज्या प्रकारे भाजपाने काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच महापालिका निवडणुकीत महापौरांच्या सर्व जागा जिंकल्या त्याचप्रमाणे जिंद पोटनिवडणूकही जिंकता येईल. काँग्रेस नेतृत्व या जागेवर विजय मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.