ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १० - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची संयुक्त जनता दलाच्या (संजद) अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. संजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नितीशकुमार यांची पक्षाच्या सर्वोच्चपदी निवड झाल्याबरोबरच तीनदा पक्षाध्यक्ष राहिलेले शरद यादव यांचा दशकभराचा कार्यकाळही संपुष्टात आला. यादव यांनी चौथ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यास नकार दिला होता. बिहारमध्ये संजदचा चेहरा असलेले नितीशकुमार यांची पक्षाध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीचे पक्षाध्यक्ष राहिलेले जॉर्ज फर्नांडिस आणि शरद यादव हे बिहारबाहेरचे होते, परंतु त्यांनी बिहारलाच आपले राजकीय घर बनविले होते. शरद यादव यांनी नितीशकुमार यांचे नाव सुचविले आणि सरचिटणीस के. सी. त्यागी व जावेद रजा यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीत संजदला घवघवीत यश मिळाले होते आणि त्यानंतर नितीशकुमार मुख्यमंत्री बनले होते. ‘समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे नितीशकुमार यांनी पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सांगितले. (वृत्तसंस्था)