नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतून (आप) बडतर्फीची घटिका जवळ आली असतानाच या पक्षाचे बंडखोर नेते योगेंद्र यादव यांनी शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमाने पुन्हा एकदा पक्षावर हल्लाबोल करीत आपल्याला बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस हा एक विनोद असल्याची टीका केली आहे.ही कारणे दाखवा नोटीस आपल्याला मिळण्याच्या आतच माध्यमांपर्यंत त्याची इत्थंभूत माहिती कशी पोहोचली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला व पक्षाच्या शिस्तपालन समितीनेच ती लीक केली असल्याचा आरोपही केला. राष्ट्रीय शिस्तपालन समितीने तिचे अध्यक्ष दिनेश वाघेला यांच्या सहभागाशिवाय कारणे दाखवा नोटीस कशी बजावली याबद्दल योगेंद्र यादव यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दूरध्वनीवर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या संभाषणात सध्या दिल्लीत नसलेले वाघेला यांनी समितीने अद्याप या मुद्यावर विचार करायचा आहे, असे आपल्याला सांगितले होते. वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांव्यतिरिक्त आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. यादव यांच्या सांगण्यानुसार रात्री ८ वाजता माध्यमांकडून त्यांना नोटीस बजावल्याची व कोणाच्या माध्यमाने ती पाठविण्यात आली आहे याची सूचना मिळाली; परंतु प्रो. आनंदकुमार यांच्या घरी नोटीस येईपर्यंत त्यांनी यावर विश्वास ठेवला नव्हता.