नवी दिल्ली : नागरिकत्वाच्या मुद्यावरून होणारी चिखलफेक थांबवा. मी दोषी असेल तर मला जेलमध्ये पाठवूनच दाखवा, या शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी पुन्हा नागरिकत्वाचा मुद्दा उकरून काढत आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांनी थेट मोदींनाच धारेवर धरले.रा.स्व. संघ आणि भाजपने माझ्या कुटुंबियांवर माझ्या बालपणापासूनच आरोप चालविले आहेत. अशा बाबींना मी घाबरणार नाही. भाजपविरुद्धचा माझा लढा सुरूच राहील. मोदींनी नागरिकत्वाच्या मुद्यावर आपल्या कंपूकडून केली जाणारी चिखलफेक थांबवावी, असे त्यांनी इंदिरा गांधी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना म्हटले. (वृत्तसंस्था)‘तुम्ही सरकारमध्ये आहात’मी लहान असतानापासून रा.स्व. संघ आणि भाजपचे लोक माझी आजी, माझे वडील आणि आईवर चिखलफेक करीत असल्याचे पाहात आलो आहे. मला त्यांना एकच सांगायचे आहे, मोदीजी आता पंतप्रधान आहेत. त्यांनी वेगळ्या पद्धतीचे आरोप चालविले आहेत. त्यात कणभराचाही सत्यांश नाही. मोदीजी तुमच्याकडे सरकार आहे, संस्था आहेत. माझी चौकशी करून दोषी आढळल्यास मला गजाआड पाठवा. मला कुठलेही भय नाही. तुम्ही तुमच्या कंपूमार्फत माझ्यासह माझ्या कुटुंबावर चालविलेली चिखलफेक थांबवा. तुम्ही विरोधक नाहीत. तुम्ही आता सरकारमध्ये आहात, असे त्यांनी सुनावले.
जेलमध्ये पाठवूनच दाखवा - राहुल गांधी
By admin | Published: November 20, 2015 3:53 AM