नाशिक - देशभरात मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले. त्यामुळे उद्या म्हणजेच 5 जून रोजी भारतात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. सऊदी अरबमध्ये 3 जून रोजी चंद्रदर्शन झाले, त्यामुळे 4 जून रोजी तेथे ईद साजरी करण्यात आली. त्यानंतर, आज मुंबईसह देशभरात चंद्रदर्शन झाले. सायंकाळच्या सुमारास स्पष्ट चंद्रदर्शन घडले.
चंद्रदर्शन झाल्यानंतर मस्जिदीतील बैठकीत धर्मगुरूं समक्ष समाज बांधवांनी चंद्रदर्शन घेतल्याची ग्वाही दिली. त्यामुळे शहरे खतीब यांनी उद्या बुधवारी रमजान ईद साजरी करण्याची घोषणा केली. उद्या देशातील बहुतांश ठिकाणी आणि मोठ-मोठ्या मस्जिदमध्ये सामूहिक नमाजपठण केले जाणार आहे. आज चंद्रदर्शन होईल म्हणून मुस्लिम बांधव आतुरतेने वाट पाहत होते. त्यानुसार चंद्रदर्शन होताच, उद्या ईद साजरी करण्यात येणार असल्याचे मुस्लिम धर्मगुरुंकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून मुस्लीम बांधवांचा सुरू असलेला रोजापैकी, आजचा रोजा यंदाच्या रमजानमधील शेवटचा रोजा ठरणार आहे. भारतासह, पाकिस्तान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील बहुतांश देशांमध्ये उद्याच ईद साजरी केली जाणार आहे. यंदाचा रमजानचा महिना 29 दिवसांचा झाला आहे. देशभरात उद्या ईदचा उत्साह दिसणार असून आतापासूनच मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. तर, हिंदू बांधवही मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन शिर कुरमा आणि गुलगुले यांची मेजवानी घेण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.