लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मंगळवारी आपल्या घटक पक्षांची बैठक आयोजित केली आहे. बंगळुरूत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीचे शक्तिप्रदर्शन म्हणून याकडे पाहिले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आता वेगाने तयारीला लागले आहेत. एनडीएतून बाहेर पडलेल्यांना परत आणण्यासाठी आणि नवीन पक्षांना सामावून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाने अलीकडचे काही महिने आणि आठवडे खूप मेहनत घेतली आहे. या बैठकीत विद्यमान व नवे सहयोगी पक्ष दिसून येतील, असे सूत्रांनी सांगितले.
ताकद वाढली? या बैठकीत एनडीएची वाढलेली ताकद व सर्व प्रदेशांचे प्रतिनिधित्व दिसेल, असे सूत्रांनी सांगितले. मोदी २.० सरकारच्या कार्यकाळात अशाप्रकारची ही पहिलीच बैठक असेल.