ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - गेल्या काही दिवसांपासून EVMवर घेण्यात येत असलेल्या शंका, होत असलेली आरोपबाजी, मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची झालेली मागणी, त्यामुळे एकंदरीत निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेले संशयाचे वातावरण, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मतदान यंत्रात छेडछाड करून दाखवाच, असे थेट आव्हान निवडणूक आयोगाने EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करणाऱ्यांना दिले आहे. त्यासाठी आरोपकर्ते, शास्त्रज्ञ आणि मतदान यंत्राच्या तंत्रज्ञानातील जाणकारांना निवडणूक आयोगाने मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून 10 मेपर्यंतचा अवधी दिला आहॆ.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 13 विरोधी पक्षांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. त्यावेळी विरोधी पक्षांनी मतदान यंत्रात होत असलेल्या छेडछाडीचा मुद्दाही उपस्थित केला. राष्ट्रपतींची भेट घेऊन आल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मतदान यंत्रातील छेडछाडीच्या आरोपांमुळे मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचा आरोप केला होता. आज राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, गुलाम नबी आझागद आणि डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश होता.
दरम्यान, सातत्याने होणाऱ्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात छेडछाड करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. त्यानुसा मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांमध्ये तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, मतदान यंत्राच्या तंत्रज्ञानाचे जाणकार आणि राजकारणी निवडणूक आयोगाकडे येऊन मतदान यंत्रात छेडछाड करण्याचा प्रयत्न करू शकतील. याआधी 2009 मध्येही मतदान यंत्रांवर शंका घेण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने अशाच प्रकारचे आव्हान दिले होते. पण त्यावेळी कुणीही मतदान यंत्रात छेडछाड करू शकला नव्हता.
काही दिवसांपूर्वी मतदान यंत्रांमध्ये फेरफार होणे शक्य आहे. जर मतदान यंत्रे सार्वजनिक झाली तर त्यात होणारी फेरफार 72 तासांत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानेही केजरीवाल यांना मतदान यंत्रात फेरफार करून दाखवण्याचे प्रतिआव्हान दिले होते. केजरीवाल यांच्या प्रमाणेच काँग्रेस, बसपा आणि अन्य पक्षांनीही मतदान यंत्राबाबत शंका उपस्थित केल्या होत्या.