चेन्नई : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातच कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये 1 जूनपासून सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केस कापण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. तामिळनाडू सरकारने सलूनसाठी एसओपी जारी केले आहे.
तामिळनाडू सरकारने जारी केलेल्या एसओपीनुसार, जर तुम्हाला केस कापून घ्यायचे असतील तर तुम्हाला आधार कार्ड दाखवावे लागेल. सलून मालक प्रत्येक ग्राहकाचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि आधार कार्ड नंबरची नोंद करेल. जर एखाद्या ग्राहकाने आधार कार्ड दाखविले नाही, तर त्याच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.
याचबरोबर, कोणतेही सलून ५० टक्के कर्मचारी (८ पेक्षा जास्त नाही) असतील तरच उघडणार आहे. तसेच, सलूनमध्ये एसी लावण्यास परवानगी नाही. सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी मास्क लावणं बंधनकारक आहे. तसेच, ग्राहकांनी आधी हात स्वच्छ धुवावे लागतील. यानंतर त्यांना आरोग्य सेतु अॅपचा तपशील दाखवावा लागेल, असेही तामिळनाडू सरकारच्या एसओपीमध्ये म्हटले आहे.
सलून मालक ग्राहकांना डिस्पोजेबल एप्रन आणि शूजसाठी कव्हर देतील. जर ग्राहकाचे बिल एक हजार रुपयांवर येणार असेल तर त्यांना डिस्पोजेबल एप्रन आणि फूट कव्हरसाठी 150 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, सलूनमध्ये येणारे ग्राहक म्हणतात की, दोन महिन्यांनंतर सलून उघडल्यामुळे आम्ही खुश आहोत. आम्ही सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करीत आहोत.
दरम्यान, तामिळनाडू सरकारने आधी ग्रामीण भागातील सलून उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता संपूर्ण राज्यात सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सलून मालकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, सलून कर्मचाऱ्यांना सतत मास्क आणि स्वच्छता राखण्याचे आदेश दिले आहेत.
आणखी बातम्या...
"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी
अमेरिकेत दंगली रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार, ४००० नागरिकांना अटक
राहुल गांधीही 'मन की बात' करणार?, लवकरच ऑनलाइन पॉडकास्ट सुरू करण्याची शक्यता