सहसा आपणास जंगली प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, हत्ती या प्राण्यांची सहजच ओळख असते. मात्र, लांडगा आणि कोल्हा यांतील फरक ओळखायचा म्हटलं की थोडं अवघड जातं. त्याचप्रमाणे, बिबट्या आणि चित्ता या दोन जंगली प्राण्यांमधील फरकही सहसा आपणास लक्षात येत नाही. त्याच अनुषंगाने एका वनपरिक्षेत्र IFS अधिकाऱ्याने एक फोटो शेअर केला असून नेटीझन्सला सवाल केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोत बिबट्या कोणता आणि चित्ता कोणता? असा प्रश्न विचारला आहे. कारण, या दोन्ही प्राण्यांच्या शरीरावरील ठिपके पाहून आपणही गोंधळून जाल.
परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रश्न विचारला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे काहींनी या कमेंटमध्ये दोन्ही प्राण्यांमधील फरकही स्पष्ट केला आहे. तर, काहींनी गंमतीशीर कमेंट करत या चर्चेत सहभाग घेतला. कासवान यांनी २८ नोव्हेंबर रोजी हे ट्विट केलं असून त्यात दोन जंगली प्राण्यांचे फोटो शेअर केले आहेत. या ट्विटला शेकडो रिट्विट असून हजारो लाईक्स आहेत. तर, अनेकांनी कमेंटमध्ये फरक आणि उत्तरही सांगितलंय.
विशेष म्हणजे पुन्हा कासवान यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, आपल्या पोस्टला १ हजारपेक्षा अधिक उत्तरे मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. फोटोतील डावीकडचा म्हणजेच पहिला बिबट्या असून दुसरा चित्ता आहे. कारण, चित्ता हा प्राणी आपल्याकडे आढळून येत नाही. हे दोन्हीही पँथर आहेत, निसर्गाने सुंदर असं रुप दोघांनाही दिलंय. मात्र, दोघांमध्ये अंतर आहे. एकाच्या शरीरावर गुलाबाच्या फुलाच्या आकाराचे डाग आहेत. तर, दुसऱ्याच्या शरीरावर ठिपके ठिपके आहेत, तो दुसरा म्हणजे जॅग्वार (चित्ता) आहे. चित्ता हा उंचीनेही बिबट्यापेक्षा मोठा असतो. बहुतांशी युजर्संने अशाच प्रतिक्रिया यावर दिल्या आहेत.