ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा इव्हीएम मशीन वादाला तोंड फोडले आहे. सकाळी आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली विधानसभेत इव्हीएमच्या फेरफारीबाबतचे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर आता केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारत अवघ्या 90 सेकंदात आम्ही इव्हीएम हॅक करून दाखवू असे आव्हान दिले आहे.
आज सकाळी दिल्लीच्या विधानसभेत आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी इव्हीएमच्या फेरफारीबाबतचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने इव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची फेरफार करता येत नसल्याचा पुनरुच्चार केला. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाला प्रतिआव्हान देताना आपण अवघ्या 90 सेकंदात इव्हीएम हॅक करून दाखवू,असे सांगितले. ते म्हणाले, "आपचे आमदार सौरभ भारद्वाज स्वत: कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. त्यांनी चिपच्या तंत्रज्ञानावर काम केले आहे. त्यांनी दिल्ली विधानसभेत हे दाखवून दिले की आपल्या देशात कशाप्रकारे इव्हीएमसोबत फेरफार होत आहे. लोकशाहीसाठी हा मोठा धोका आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाने याविरोधात आवाज उठवला पाहिजे."
दरम्यान, आपने विधानसभा निवडणुकीमधील इव्हीएम प्रात्यक्षिकासाठी वापरलं असेल तर ती गंभीर बाब आणि चोरीचा गुन्हा ठरेल, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी म्हटले आहे. तसेच इव्हीएम हॅक करणे शक्यच नसल्याचे या सूत्रांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी आज सकाळी आम आदमी पार्टीचे निलंबित आमदार कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवालांवर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दिल्ली विधानसभा आज चांगलीच गाजली आहे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारावर उत्तर देण्याऐवजी आरोपांना बगल देत ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला . आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी इव्हीएमच्या फेरफारीबाबतचे प्रात्यक्षिक दाखवले.
आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभेत उचललेल्या ईव्हीएम मशिनमधल्या छेडछाडीच्या मुद्द्याचा कपिल मिश्रांनी खरपूस समाचार घेतला आहे. उद्या अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष लोकांच्या बोटांमध्येही गडबड असल्याचंही सांगेल, असं म्हणत मिश्रांनी केजरीवालांसह आपवर टीकास्त्र सोडलं आहे. निवडणुकीत विजय न मिळाल्यानं लोकशाहीवर टीका करणं चुकीचं आहे.