यूपीएससीच्या निकालानंतर अनेक प्रेरणादायी गोष्टी समोर येतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. शाळा-कॉलेज परीक्षेत टॉप करणाऱ्या मुलीची ही गोष्ट आहे. अनेक सुवर्णपदकं जिंकून ती आपल्या महाविद्यालयाची शान बनली आणि त्यानंतर वकील म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी ती लंडनला गेली. तिथून परत आल्यानंतर तिने UPSC परीक्षेची तयारी केली आणि त्यातही ती यशस्वी झाली. श्रद्धा गोमे असं या मुलीचं नाव असून तिची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...
श्रद्धा गोमेने वयाच्या 26 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ती मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे. तिचे वडील रमेश कुमार गोमे हे निवृत्त SBI अधिकारी आहेत आणि आई वंदना गृहिणी आहेत. भाऊ रोहित गोमे हाही कायद्याचे शिक्षण घेत आहे. तिने सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती. दोन्ही परीक्षांमध्ये ती इंदूर टॉपर होती. शालेय जीवनात त्यांनी आंतरराष्ट्रीय वादविवाद स्पर्धा जिंकली होती.
लॉ एंट्रेस परीक्षेत म्हणजेच क्लॅट परीक्षेत अव्वल झाल्यानंतर तिला NLSIU बंगळुरूमध्ये प्रवेश मिळाला. 2018 मध्ये बीए एलएलबी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा गोमेने हा अभ्यासक्रम शिकत असताना 13 सुवर्णपदके जिंकली. पदवीचे शिक्षण पूर्ण होताच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये कायदेशीर व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर ती अनेकदा लंडन ते मुंबई दरम्यान अप-डाऊन करत असे.
यूपीएससी परीक्षेत श्रद्धा गोमेचा ऑप्शनल विषय लॉ होता. इंदूरमध्ये राहून तिने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यासाठी UPSC अभ्यासक्रम आणि गेल्या 25 वर्षातील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास केला. ऑनलाइन अभ्यासासोबतच ऑप्शनल विषयासाठी लॉ नोट्सची रिविजन केली. 2020 मध्ये तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ती 8-10 तास अभ्यास करायची. यूपीएससी प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती मुलाखतीच्या तयारीसाठी दिल्लीला आली.
दिल्लीत 15 दिवसांत अनेक मॉक इंटरव्ह्यू दिले. तिची मेहनत फळाला आली आणि ती UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात 60 व्या रँकने आयएएस अधिकारी बनली. तिला राजस्थान केडर देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती सध्या अजमेरमध्ये तैनात आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना तिने स्वत:ला आयसोलेट केलं नाही. फक्त अभ्यास करत असतानाच ती स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवायची. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.