वाराणसी : हिंदूंच्या सर्वात पवित्र काशी नगरीत एक क्रांतिकारी घटना घडली. देशभरातून आलेल्या शेकडो तृतियपंथींनी येथील काशी विश्वनाथ व अन्नपूर्णा मंदिरात महापूजा केली व पितृपक्षाचे निमित्त साधून गंगाकिनारी आपल्या पूर्वजांचे श्राद्धकर्मही केले.कदाचित मुगल साम्राज्याच्या काळानंतर गेल्या चार दशकांत समाजातील या तिरस्कृत घटकास हे धार्मिक विधी काशीसारख्या कर्मठ तीर्थक्षेत्री प्रथमच करू दिले गेले. सर्वोच्च न्यायालयाने तृतियपंथींना स्वतंत्र ओळख दिल्याने ते अधिक उजळ माथ्याने जगू लागले आहेत व समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे, याचे हे स्वागतार्ह द्योतक मानले जात आहे.सध्या सुरु असलेल्या पितृपक्षात लाखो श्रद्धाळू हिंदू विविध तीर्थक्षेत्रांवर आणि पवित्र संगमांवर जाऊन आपल्या पितरांचे तर्पण करीत आहेत. यानुसार शेकडो तृतीयपंथींनी त्यांच्या धार्मिकगुरु महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वनाथ मंदिरात आणि माँ अन्नपूर्णा मंदिरात दुग्धाभिषेक व षोडषोपचार पूजा केली. या तृतियपंथी भक्तांनी बाबा विश्वनाथाच्या पिंडीवर ११ लिटर दुधाचा अभिषेक केला व त्यानंतर त्यांना रीतीनुसार ‘मांग वस्त्र’ (सुवासिनीचे वाण) व प्रसाद देण्यात आला, असे विश्वनाथ मंदिराचे पुजारी आचार्य श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. यानंतर या तृतियपंथींनी माँ अन्नपूर्णेच्या दरबारात जाऊन ‘कुकुंमार्जन’ केले व सर्वाच्या सुख, समृद्धी व शांततेसाठी प्रार्थना केली.यानंतर या समुहाने गंगेच्या काठी जाऊन आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभावी, यासाठी विधिवत श्राद्धकर्म केले. इतरांप्रमाणे आमच्याही श्रद्धा आणि भाव-भावना असतात. इतरांप्रमाणे आम्हालाही आपल्या पूर्वजांच्या ऋणातून श्राद्धविधीने उतराई व्हावे, असे मनापासून वाटते. परंतु इतकी वर्षे आम्हाला बहिष्कृताची वागणूक देऊन पंडित व पुजारी मंदिरातही येऊ देत नसत. आता आम्ही पुजाऱ्यांचे मन वळविले व तेही तयार झाले. म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने एकदमच येथे आलो, अशी भावना एका तृतियपंथीने सर्वांच्या वतीने व्यक्त केली.शेकडो वर्षांनी आम्हाला काशीत उजळ माथ्याने, कोणताही भेदभाव आणि तिरस्कार न करता पूजा व श्राद्धविधी करू दिले गेले याचा त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. एक वयोवद्ध तृतियपंथी म्हणाली की, असे बहुधा दुसऱ्यांदा घडले. याआधी मुगलांच्या साम्राज्यात असे घडले होते,असे आमच्या कित्येक पिढ्यांना लहानपणापासून सांगण्यात येत असे.
तृतीयपंथींनी काशीत केले श्राद्धविधी; पुन्हा ‘असा’ जन्म न मिळो!
By admin | Published: September 26, 2016 12:50 AM