Shraddha Walkar Murder Case: अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात आता ०१ जून पासून न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपी आफताब पुनावाला (Aftab Punawala) याच्यावर आता आरोप निश्चित करण्यात आले आहेत. श्रद्धाची हत्या करुन पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप आफताबवर ठेवण्यात आला आहे. आफताबला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी विनंती न्यायालयाला करणार असल्याचे श्रद्धाच्या वडिलांनी म्हटले आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडाची सुनावणी दिल्लीच्या साकेत सत्र न्यायालयात ०१ जूनपासून सुरू होणार आहे. आफताब पुनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र दुसरीकडे, आफताबने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या खटल्याला सामोरे जाणार असल्याचे आफताबने सांगितले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ६,६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करावी आणि आम्हाला न्याय द्यावा
आम्हाला वाटते आरोपीला फाशी द्यावी. मी न्यायालयाला विनंती करेन की लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड उघडकीस आल्यावर एकामागून एक हादरवणारे खुलासे समोर आले. आफताब पूनावालाने तिची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर तिचा चेहरा आणि डोके ओळखू नये यासाठी बर्नरने जाळून विद्रूप केला. श्रद्धाची हाडे जाळणे, ग्राइंडिंग मशीनमध्ये दळणे हा त्याचा पूर्वीचा खुलासा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी होता, अशी कबुली आफताबने दिली होती.
दरम्यान, पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, हत्येच्या रात्री तो त्याच्या घराजवळील हार्डवेअरच्या दुकानात गेला आणि त्याने एक करवत, तीन ब्लेड, एक हातोडा आणि प्लास्टिकची क्लिप विकत घेतली होती.