Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. श्रद्धा हत्याकांडातील आरोपीकडून माहिती मिळवण्यासाठी आफताबची नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. पण, त्यातून हाती काहीच लागले नाही. यातच आता दिल्लीपोलिसांना एक महत्त्वाचा अहवाल मिळणार असून, श्रद्धा हत्याकांडसंदर्भात तो निर्णायक ठरू शकतो, असा कयास बांधला जात आहे.
या प्रकरणी दररोज नवनवीत खुलासे होत असून, पोलीसही चक्रावून गेले आहेत. श्रद्धा हत्याकांडात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आफताबच्या नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्टचा अहवाल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी या आठवड्यात दिल्ली पोलिसांना सोपवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक वेगवान होईल. या दोन्ही टेस्टमध्ये विचारलेल्या प्रश्नांची आफताबने नेमकी काय उत्तरे दिली, याची यादीही दिल्ली पोलिसांना देण्यात येणार आहे.
दिल्ली पोलिसांसाठी दोन अहवाल अत्यंत महत्त्वाचे
श्रद्धा हत्याकांडाच्या तपासात आफताबचे हे दोन्ही अहवाल दिल्ली पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरु शकतात. श्रद्धा हत्याकांड प्रकरणाची उकल करण्यासाठी आफताबचे पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी अहवाल पोलिस तपासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे सांगितले जात आहे. या हत्याकांडाच्या तपासासाठी केलेल्या डीएनएचा अहवाल येणे बाकी आहे. हा डीएनए रिपोर्ट सीएफएसएलकडून येईल, ज्याच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळालेली हाडे ही श्रद्धाच्या शरीराशी संबंधित आहेत की नाही, याची माहिती पोलिसांना मिळू शकेल.
दरम्यान, श्रद्धा हत्याकांडात तपास पुढे नेण्यासाठी पोलिसांच्या हाती अद्यापही ठोस पुरावे नसल्याचे सांगितले जाते आहे. तसेच हे सहा महिने जुने खून प्रकरण असून ज्या ठिकाणी गुन्हा घडला, ती जागा साफ करण्यात आली आहे. आपण धूर्त असल्याचे भासणाऱ्या आरोपीच्या कबुलीजबाबावर पोलिस पूर्णपणे अवलंबून आहेत, असे दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"