Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरातील जंगलात फेकण्यात आले. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून, दररोज नवनवीत खुलासे होताना दिसत आहेत. यातच आफताबची नार्को टेस्ट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या नार्को टेस्टबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
आफताबची नार्को टेस्ट होणार नाही. नार्को टेस्ट करण्याआधी पॉलिग्राफ चाचणी करायची असते. तसेच इतरही काही चाचण्या करणे आवश्यक आहे. मात्र आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीसाठी न्यायालयाने अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच परवानगी मिळवण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परवानगी मिळेपर्यंत आफताबची नार्को टेस्ट करता येणार नाही, असे सांगितले जात आहे.
नार्को टेस्ट बेकायदा आहे, मग का केली जातेय?
भारतातील नार्को टेस्ट बेकायदा असल्याचे सांगितले जात आहे. २२ मे २०१० रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेल्वी विरुद्ध कर्नाटक प्रकरणी निकाल देताना नार्को टेस्टला घटनाबाह्य घोषित केले. तत्कालीन सरन्यायाधीश केजे बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने नार्को टेस्टचे वर्णन अमानवी, क्रूर आणि अपमानास्पद, असे केले होते. कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याची नार्को टेस्ट करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते. औषधाच्या प्रभावाखाली आरोपीकडून घेतलेले वक्तव्य हे त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच न्यायालयाने निकालात स्पष्टपणे म्हटले होते की, कोणावरही नार्को टेस्ट करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही आणि कोणी स्वत:च्या इच्छेने चाचणी करण्यास तयार असेल, तर तो न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येणार नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने नार्को टेस्ट घटनाबाह्य ठरवली असली तरी, तपासासाठी तिच्या वापरावर बंदी घातलेली नाही.
दरम्यान, आफताब वारंवार आपले म्हणणे बदलून तपासाची दिशाभूल करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नार्को टेस्टला परवानगी द्यावी, असे आवाहन करताना पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते की, आफताब वारंवार आपले म्हणणे बदलत आहे आणि तपासात मदत करत नाही, त्यामुळे त्याच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी नार्को टेस्ट आवश्यक आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"