मयुरभंज : आपणा सर्वांना खांद्यावर कावड घेऊन आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन जाणा-या श्रावण बाळाची गोष्ट माहीत आहे, पण कलियुगातील एक श्रावणबाळ सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा, न्याय मिळण्यास होणारा विलंब आणि गावक-यांनी वाळीत टाकल्याने स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीवर श्रावण बाळ होण्याची वेळ आली आहे. म्हाता-या आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे त्याला सिद्ध करायचे आहे. ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मोरोदा गावात राहणा-या कार्तिक सिंहने आपल्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा आहे, असा आरोप केला आहे. त्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टाच्या सतत तारखा पडत राहतात. त्या वेळी तो खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करतो. त्यांना वाहनाने नेण्याइतके पैसे त्याच्याकडे नाहीत. त्याच्याविरोधात २००९ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्याला १८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर, गावकºयांनीही त्याला वाळीत टाकले. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याने नोकरीसाठी मला शहरात जाता येत नाही, असे तो सांगतो. कोर्टात गेल्यावर घरात आई-वडिलांची काळजी घेणारे कोणी नसल्याने तो त्यांना कावडीत बसवून ४० किलोमीटरची पायपीट करतो. कार्तिक सुशिक्षित आहे, पण गुन्हा दाखल झाल्याने त्याला नोकरी मिळालेली नाही. याच कारणामुळे त्याचे अजून लग्नही झालेले नाही.
कलियुगातील श्रावण बाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 4:18 AM