मयुरभंज, दि. 1- खांद्यावर कावड घेऊन आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन गेलेल्या श्रावण बाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. लहानपणी अनेकदा प्रत्येकाने ही गोष्ट ऐकली असेलच. पण आता कलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. पोलिसांकडून दाखल झालेला खोटा गुन्हा, न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळायला होणारा उशिर आणि ग्रामस्थांनी वाळीत टाकल्याने ओडिशातील एका व्यक्तीवर श्रावण बाळ होण्याची वेळ आली आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीचा संघर्ष सुरु आहे.
ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मोरोदा गावातील कार्तिक सिंह यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण कोर्टात गेल्याने आणि हातात पैसा नसल्याने खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ कार्तिक यांच्यावर आली. कार्तिक यांच्याविरोधात २००९ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्यांना १८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
कार्तिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना ग्रामस्थांनी त्यांना वाळीत टाकलं. ‘माझ्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही. गावातील लोकांकडून कोणतंही काम दिलं जात नाही. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी घरात कोणीही नसल्याने नोकरीसाठी शहरातही जाता येत नाही’असं कार्तिक यांनी सांगितलं आहे. सुनावणीसाठी कोर्टात गेल्यावर घरात आई-वडिलांची काळजी कोण घेणार, असा प्रश्न कार्तिक यांच्यासमोर निर्माण होतो. म्हणूनच ते आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करतात.खोटा गुन्हा दाखल झालेले कार्तिक सुशिक्षित आहेत. पण ६ ते ७ वर्षांपासून गुन्हा दाखल असल्याने तसंच त्या प्रकरणाचा अजूनही निकाल न लागल्याने नोकरी मिळत नसल्याचं ते सांगतात. याच कारणामुळे त्यांचं अजून लग्न झालेलं नाही.ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात असे अनेकजण असल्याचं वकील प्रभूदान मरांडी यांचं म्हणणं आहे. कार्तिक यांच्याबरोबर जे झालं ते याआधीही अनेकांसोबत झालं आहे. अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचं मरांडी यांनी सांगितलं. मयुरभंज पोलिसांनी याआधीही अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांच्या या खोट्या गुन्ह्याची शिक्षा अनेकांना भोगावी लागली आहे, असंही वकिलांनी सांगितलं.