एस. पी. सिन्हारांची : झारखंड येथील गिरिदीह येथे जैन समाजाच्या आदरस्थानी असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या विश्वविख्यात पवित्र स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय झारखंड सरकारने अखेर रद्द केला. त्यामुळे श्री सम्मेद शिखरजीचा तीर्थस्थळाचा दर्जा आता कायम राहणार आहे. या स्थळाबाबत जैन समाजाने दिलेल्या प्रखर लढ्यापुढे झारखंड सरकार झुकले आहे.
झारखंडचे पर्यटनमंत्री हफीजुल हसन अन्सारी यांनी सांगितले की, जनतेच्या भावना लक्षात घेऊन श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. श्री सम्मेद शिखरजीला तीर्थस्थळाचा असलेला दर्जा कायम राहील, असेही ते म्हणाले. झारखंड सरकारच्या प्रस्तावावरून श्री सम्मेद शिखरजी या पवित्र ठिकाणाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची अधिसूचना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने २ ऑगस्ट २०१९ रोजी जारी केली होती. त्याच दिवसापासून जैन समाजाने त्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले होते. हा निर्णय झारखंड सरकारने रद्द करावा, तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जैन समाजाने केली होती.
आपल्या मागणीसाठी झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारविरोधात जैन समाजाने देशभरात आपल्या आंदोलनाची धार कायम ठेवली होती. श्री सम्मेद शिखरजीच्या मुद्द्याबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व केंद्रीय मंत्र्यांना जैन समाजाने निवेदने सादर केली होती. श्री सम्मेद शिखरजीला असलेला तीर्थस्थळाचा दर्जा कायम राखावा, या मागणीसाठी जैन समाजाने दिल्लीतही नुकतेच एका भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते.
...अखेर योग्य निर्णय - विजय दर्डासकल जैन समाज या संघटनेचे अध्यक्ष व लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी सांगितले की, श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय झारखंड सरकारने रद्द केला हे अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे. जैन समाजाने केलेल्या आंदोलनापुढे झारखंड सरकारला झुकावे लागले. जैन समाजाने केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. दरम्यान, झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी विजय दर्डा यांनी याआधी केली होती. या प्रकरणी त्यांनी केंद्र सरकारचेही लक्ष वेधले होते. श्री सम्मेद शिखरजी हे २० तीर्थंकरांचे निर्वाणस्थळ व जैन समाजाचे पवित्र तीर्थस्थळ आहे, असे त्यांनी म्हटले होते. माजी आमदार बाळा नांदगावकर यांनीही जैन समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला होता.
जैन समाजाचे रस्त्यावर उतरून आंदोलनश्री सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात बुधवारी दिल्लीपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशसहित अनेक राज्यांत जैन समाजाने रस्त्यावर उतरून झारखंड सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. सकल जैन समाज या संघटनेने बुधवारी भारत बंद पुकारला होता. त्या आवाहनानुसार देशातील कित्येक शहरांत, गावांमध्ये जैन समाजाने आपले उद्योग, व्यवसाय बंद ठेवले होते. श्री सम्मेद शिखरजीबाबत जैन समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला अन्य धर्मीयांनीदेखील पाठिंबा दिला व आपली दुकाने-व्यवसाय बुधवारी बंद ठेवले होते.