ओडिशातील जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाने भाविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार सर्व भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. पुढील वर्षी १ जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांना ड्रेसकोड असेल तरच मंदिरात प्रवेश करता येणार आहे. त्यासाठी भाविकांना आत्तापासून जागृत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर १ जानेवारीपासून मंदिरात छोटे कपडे, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस यांसारख्या कपड्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. असे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. तसेच, मंदिरात कोणते कपडे घालायचे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी लवकरच निर्णय घेतला जाईल.
जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविक छोटे कपडे परिधान करून दर्शनासाठी मंदिरात येतात. ते पाहता मंदिराच्या धोरणात्मक उपसमितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता फक्त त्या लोकांनाच मंदिरात जाण्याची परवानगी असेल, जे नियमानुसार पूर्णपणे कपडे घालून येतील.
मंदिरात देव असतो, हे श्रद्धेचे ठिकाण असून करमणुकीचे ठिकाण नाही. येथे येणारे लोक असे कपडे घालतात की जणू ते एखाद्या उद्यानात किंवा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जात आहेत. जे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत इतर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, असे मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी सांगितले.
मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी असल्याचे जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. ज्यासाठी १ जानेवारी २०२४ पासून लागू होणाऱ्या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याची जबाबदारी मंदिराच्या दारात तैनात सुरक्षा कर्मचारी आणि मंदिरात उपस्थित सेवकांवर सोपवण्यात आली आहे. हे सर्व लोक येथे येणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवतील, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यासोबतच उत्तराखंडमधील तीन मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू आहे.