कर्नाटकात वीर सावरकर यांच्या पोस्टवरुन चांगलंच वादंग उठवलं असून हा वाद अधिकच तीव्र होताना दिसत आहे. शिवमोगा येथून भाजप आमदार केएस ईश्वरप्पा यांनी मुस्लीम युवकांना नियंत्रणात राहाण्याचे आवाहन केलं होतं. आता, श्रीराम सेनेचे प्रमुख मुथालिक यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. जर कोणी सावरकरांच्या फोटोला हात लावला, तर त्याचा हात कापण्यात येईल, अशी धमकीच मुथालिक यांनी दिली आहे. त्यामुळे, सावरकरांच्या पोस्टवरील वाद आणखी चिघळत आहे.
कर्नाटकच्या शिवमोगा येथे काही दिवसांपूर्वी वि.दा. सावरकर यांचे पोस्टर लावण्यावरुन वाद निर्माण झाला होता. एका समुदायाने सावरकर यांच्याऐवजी टिपू सुल्तान यांचे पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच हा वाद निर्माण झाला, त्यामुळे, पोलिसांनी या परिसरात कलम 144 लागू केले होते. दरम्यान, एकीकडे हा वाद सुरू असतानाच श्रीराम सेनेने संपू्र्ण राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पोस्टर लावण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मुथालिक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संपूर्ण राज्यात वीर सावरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांचे 15 हजार पोस्टर्स लावण्यात येतील. सावरकर हे मुस्लीमांविरुद्ध नव्हते, ते इंग्रजांविरुद्ध होते, ते स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते. जर मुस्लीम किंवा काँग्रेसने जर सावरकरांच्या फोटोला स्पर्श केल्यास त्यांचे हात कापू, अशा इशाराच मुथालिक यांनी दिला आहे.
दरम्यान, यापूर्वी पोस्टर वादात भाजप आमदारानेही इशारा दिला होता. शिवमोगाचे भाजप आमदार ईश्वरप्पा यांनी विधान केले होते. मी मुस्लीम समाजातील वरिष्ठ मंडळींना आवाहन करतो की, त्यांनी देशविरोधी कारवाया करणाऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या मुस्लीम युवकांना नियंत्रित ठेवले पाहिजे. जर, हिंदू समाज पेटून उठला तर राष्ट्रविरोधी कारवाया होणार नाहीत अन् राष्ट्रद्रोही जिवंत राहणार नाहीत, असे ईश्वरप्पा यांनी म्हटले होते.